टोरँटो / महान कार्य वृत्तसेवा
कॅनडामध्ये भारतीयांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे. सरकारने संसदेत सांगितल्याप्रमाणे, गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये 1000 हून अधिक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धापकाळ किंवा आजारपणासारख्या नैसर्गिक कारणांमुळे झाले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने सरकारने कॅनडाहून 757 भारतीयांचे मृतदेह भारतात आणले, अशी माहिती परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली.
परराष्ट्र मंत्रालयाला गेल्या पाच वर्षांत कॅनडामध्ये मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल विचारण्यात आले. यावर स्पष्टीकरण देताना कीर्ती वर्धन सिंह यांनी संसदेत सांगितले की, ”मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 2020 ते 2024 दरम्यान कॅनडामध्ये एकूण 1 हजार 203 भारतीयांचा मृत्यू झाला.
यापैकी बहुतेक मृत्यू हे वृद्धत्व आणि गंभीर आजारामुळे झाले. शिवाय, अपघात, हिंसाचार, हत्या आणि आत्महत्या यांसारख्या अनैसर्गिक कारणांमुळे अनेक मृत्यू झाल्याची माहिती आहे.”भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडे एक विशिष्ट मानक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत, सर्व भारतीय दूतावास आणि केंद्र सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांच्या समस्यांसाठी एकत्र काम करतात, अशी माहिती कीर्ती वर्धन सिंह यांनी दिली. या प्रक्रियेत मृत्यू, स्थानिक पातळीवर अंत्यसंस्कार किंवा दफनविधीची व्यवस्था करणे, मृतदेह भारतात त्यांच्या कुटुंबाकडे पोहोचवणे यांचा समावेश आहे.
