तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा
तारदाळ ते निमशिरगाव हा सांगली -कोल्हापूर हायवे ला जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावर खडी टाकून मलमपट्टी करण्याचे काम संबंधित विभाग करीत असल्याने वाहनधारक व ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सदर रस्त्याची दयनीय अवस्था याबाबत महान कार्य न्युज व दैनिकांत याबाबत बातमी प्रसारित केली होती. या अनुषंगाने संबंधित विभागाने रस्त्यावर खडी टाकून आपण काहीतरी काम करतोय हे नागरिकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु तारदाळ ते निमशिरगाव या महत्त्वाच्या रस्त्यावर खडी टाकून मलमपट्टीचे काम सुरू असून, कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्या रस्त्यावर फक्त वरवर खडी पसरवली जात असून, ती व्यवस्थित दाबून रोलींग करून न घेतल्याने वाहनांच्या चाकाखाली खडी उडून पुन्हा रस्त्यावर विखरत आहे. यामुळे प्रवाशांना खड्डा व खडीमुळे अपघाताचा अधिक धोका आणि प्रवासात गैरसोय होत आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, रस्त्यावरील खड्डे भरून त्यामध्ये खडी टाकून योग्य प्रकारे रोलींग केल्यासच या कामाचा फायदा होईल. अन्यथा काही दिवसांत खडी विखरत जाऊन रस्ता पूर्ववत खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था जैसे थे होणार आहे. सार्वजनिक निधी खर्चून निकृष्ट दर्जाचे काम करणे हा सरळसरळ गैरवापर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कामकाजाची पाहणी करून योग्य दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होत आहे.
