Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

भारताच्या संरक्षण उत्पादनात विक्रमी वाढ झाली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली आहे.

 भारताने 2024-25 या आर्थिक वर्षात एक लाख 50 हजार 590 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले. याआधी 2023 – 24 या आर्थिक वर्षात भारताने एक लाख 27 हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. देशाच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक उल्लेखनीय बाब आहे. याआधी 2019 – 20 या आर्थिक वर्षात भारताने 79 हजार 071 कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्याचे उत्पादन केले होते. सोप्या शब्दात सांगायचे तर अवघ्या पाच वर्षांमध्ये भारताच्या संरक्षण साहित्याच्या उत्पादनात 90 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. या ऐतिहासिक कामगिरीची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन दिली.

भारत सरकार, संरक्षण साहित्यासाठी संशोधन करणाऱ्या सरकारी आणि खासगी प्रयोगशाळा, संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे सरकारी आणि खासगी कारखाने तसेच या कारखान्यांना मदत करणारे इतर लहान – मोठे कारखाने या सर्वांच्या संघटीत प्रयत्नांमुळेच देशाने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ही सांघिक कामगिरी आहे. या कामगिरीमुळे हे सिद्ध होते की भारत संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यास सक्षम आहे. देशाने संरक्षण साहित्याच्या क्षेत्रात नवनवे विक्रम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच आपण आणखी मोठी भरारी घेऊ, असाही विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

भारताच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात सरकारी कंपन्यांचा वाटा 77 टक्के आणि खासगी कंपन्यांचा वाटा 23 टक्के आहे. देशाच्या संरक्षण साहित्य उत्पादनाच्या क्षेत्रात खासगी कंपन्यांचा वाटा मागील आर्थिक वर्षात 21 टक्के होता, जो आता दोन टक्क्यांनी वाढला आहे.