आमदार डॉ. अशोकराव माने, भाजप नेते अरुण इंगवले यांच्या हस्ते लोकार्पण उत्साहात
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगलेचे आमदार डॉ. अशोकराव माने बापू यांच्या विशेष प्रयत्नाने आणखी पाच नवीन लालपरी बसेस हातकणंगलेकरांच्या सेवेत दाखल झाल्या. याचा लोकार्पण सोहळा आ. अशोकराव माने एसटी महामंडळाचे माजी संचालक भाजप नेते अरुण इंगवले यांच्या हस्ते करण्यात आला. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या बसेस इचलकरंजी आगाराकडे सुपूर्द करण्यात आल्या.
इचलकरंजी आगारास बसेसची कमतरता भासत होती. यापूर्वी आ. डॉ. राहुल आवाडे यांच्या माध्यमातून 5 लाल परी देण्यात आलेल्या आहेत. आता आमदार अशोकराव माने यांच्या विशेष प्रयत्नाने आणखीन 5 बसेस इचलकरंजी आगाराला मिळाल्या आहेत. पेठवडगाव, हातकणंगले, इचलकरंजी आदी मार्गांवर या बसेस धावणार आहेत. अशी माहिती आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी दिली.
शनिवारी सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत लालपरिचे पूजन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिशबाजी आणि एकमेकांना पेढे भरून स्वागत करण्यात आले. बसेसचे पूजन झाल्यानंतर आ.अशोकराव माने आणि अरुण इंगवले यांच्यासह उपस्थित नागरिकांनी बस मधून प्रवास करत आळते येथील रेणुका देवीचे दर्शन घेतले.
इचलकरंजी आगारासाठी शक्य तितक्या सोयी सुविधा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. माने यांनी सांगितले तर पेठवडगाव-मिरज अशी थेट बस सेवा सुरू करण्याची सूचना अरुण इंगवले यांनी केली. मान्यवरांचे स्वागत आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, हातकणंगलेचे नगरसेवक राजू इंगवले, माजी नगरसेवक अण्णासाहेब चौगुले, भाजप शहराध्यक्ष अमर इंगवले, भाजप मंडळ अध्यक्ष शितल हावळे, माजी सरपंच रमजान मुजावर, आळतेचे उपसरपंच अमित पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन समाजभूषण अनिल कांबळे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे चेअरमन सुहास राजमाने, विजय निंबाळकर, आप्पा पाटील, वाहतूक नियंत्रक रमेश नाईक एम. बी. जमादार, के. एस. रुके इतर सर्व वाहक, चालक कर्मचारी आदींसह प्रवासी महिला व नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
