विश्वजीत पाटील मुकुंद कांबळे न्यायालयीन कोठडीत
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या विश्वजीत पाटील आणि मुकुंद कांबळे या दोघा कर्मचाऱ्यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली, न्यायालयाने तसे आदेश दिले. दोघांच्याही वतीने न्यायालया समोर जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला मात्र या संदर्भातील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे,
शाळा दुरुस्तीचे कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करुन महानगरपालिकेची अठरा लाखाची फसवणूक केल्या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महापालिकेतील लेखा विभागातील कार्यरत कर्मचारी विश्वजित जयकुमार पाटील (वय 49 रा. कोरोची) आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद अमृत कांबळे (वय 41 रा. कामगार चाळ) या दोघांना अटक केली होती,याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधिक्षक श्रीमती सुवर्णा पत्की या तपास करीत आहेत. या दोघांनाही न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मक्तेदार शैलेश रंगराव पोवार (वय 37 रा. धान्यओळ) याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. महापालिकेची आर्थिक फसवणूक करण्याच्या प्रकारात या दोघां व्यतिरिक्त आणखीन कोणाचा सहभाग आहे याचा देखील तपास अधिक सखोलपणे करण्यात येत आहे,याप्रकरणी आणखीनही काही धक्कादायक माहिती नजीकच्या काळात पुढे येण्याची शक्यता असल्याने संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यात अस्वस्थता पसरली असल्याची चर्चा आहे.
