Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मोठी गळती लागली आहे. काँग्रेससह शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गटातील अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सत्ताधारी पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. दरम्यान, पवार काका पुतण्याकडून मात्र एकनाथ शिंदेंना खिंडीत गाठलं जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागच्या आठवड्यात रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांना गळाला लावलं. साबळे हे महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावलेंचे समर्थक मानले जातात. तसेच ते मतदारसंघातील प्रमुख नेते देखील मानले जातात, अशा स्थितीत अजित पवारांनी शिंदे गटाच्या या महत्त्वाच्या नेत्याला आपल्या पक्षात स्थान दिलं आहे. राजीव साबळे यांनी अनेक नगरसेवकांसह अजित पवारांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश केला.

ही घटना ताजी असताना आता शरद पवारांनी देखील एकनाथ शिंदेंच्या पक्षावर दुसरा स्ट्राईक केला आहे. पवार गटाने बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाला मोठे भगदाड पाडलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते डॉ. संतोष तायडे हे कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गळाला लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे हे ‘ऑपरेशन’ पहावयास मिळत आहे.

शिंदे गटाचे नेते डॉ संतोष तायडे यांनी मुंबईमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आनंद दिघे यांच्या तालमीत मोठे झालेले डॉ संतोष तायडे आता शरद पवार गटात गेले आहेत. सुरुवातीच्या काळात मुंबईमधून आनंद दिघे यांच्या सहवासात डॉ तायडे यांनी एकनिष्ठ कडवट शिवसैनिक म्हणून काम केले. मात्र त्यांना शिंदे गटात त्यांना सावत्र वागणूक मिळत असल्याने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. मुंबई येथील पक्ष कार्यालयात माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते भव्य असा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.