आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई : 8 ऑगस्ट पर्यँत पोलीस कोठडी
सुभाष भस्मे /महान कार्य वृत्तसेवा
शाळा दुरुस्तीचे कोणतेही काम न करता केवळ कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करुन महानगरपालिकेची अठरा लाखाची फसवणूक केल्या प्रकरणात आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने महापालिकेतील लेखा विभागातील कार्यरत कर्मचारी विश्वजित जयकुमार पाटील (वय 49 रा. कोरोची) आणि सेवानिवृत्त कर्मचारी मुकूंद अमृत कांबळे (वय 41 रा. कामगार चाळ) या दोघांना अटक केली असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधिक्षक श्रीमती सुवर्णा पत्की यांनी दिली. या दोघांनाही न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मक्तेदार शैलेश रंगराव पोवार (वय 37 रा. धान्यओळ) याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे.
सन 2020 ते 2023 या मुदतीत शहरातील महापालिकेच्या पाच शाळांच्या दुरुस्ती व मैदान विकसितचे काम न करता बनावट व बोगस रेकॉर्ड तयार करून शैलेश पोवार या मक्तेदाराची 18 लाख 5 हजार 546 रुपयांची दोन बिले काढत अपहार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी उघडकीस आणला होता.
याप्रकरणी जबाबदार सर्वच खातेप्रमुखांसह संबंधित मक्तेदाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बावचकर यांनी तत्कालीन आयुक्त दिवटे यांच्याकडे केली होती. त्यावर दिवटे यांनी तत्कालीन उपायुक्त तैमुर मुल्लाणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या प्रकरणाची चौकशी करुन मुल्लाणी यांनी दिलेल्या अहवालानुसार काम न करता बोगस रेकॉर्ड तयार करुन मक्तेदाराने अधिकार्यांच्या बोगस सह्या करुन बिल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून येत असल्याचे म्हटले होते. तर तत्कालीन मुख्य लेखापाल व प्रशासनाधिकारी यांनीही या प्रकरणात गांभिर्य न बाळगता गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणावरुन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तर प्रथमदर्शनी शैलेश पोवार या मक्तेदाराचा खात्यावर रक्कम जमा झाल्याने या फसवणूकीत त्याचा थेट सहभाग दिसून आला होता. त्यानुसार महापालिकेने पोवार याच्यावर तत्कालीन उपलेखापाल करुणा शेळके यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.
दरम्यान, इचलकरंजी महानगरपालिकेत विकासकामे न करताच बिले आदा करण्याचा प्रकार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे तत्कालीन इचलकरंजी नगरपरिषद आणि आताच्या महानगरपालिकेतील मागील दहा वर्षातील संपूर्ण कामांची आर्थिक गुन्हे अन्वेषण अथवा इडी मार्फत सखोल चौकशी करुन यामध्ये गुंतलेल्या मक्तेदार व अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी लक्षवेधी तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी सन 2023 च्या पावसाळी अधिवेशनात मांडली होती. त्याची दखल घेऊन तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी,संपूर्ण प्रकरणाची आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले होते. त्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधिक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
या प्रकरणात महापालिकेतील लेखा विभागातील लिपित विश्वजित पाटील व महिला व बाल कल्याण विभागातील सध्या सेवानिवृत्त असलेल्या मुकूंद कांबळे यांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांना न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहेत. यांच्यासोबत अन्य कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक पत्की यांनी दिली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकिल श्रीमती एन. पी. शेट्टी यांनी काम पाहिले.
