Spread the love

रुई येथे महिला बचत गटांना औषधी ,फळ वृक्षांचे वाटप ; विविध मान्यवरांची उपस्थिती ; वृक्ष लागवड, संवर्धनाचा निर्धार

इचलकरंजीमहान कार्य वृत्तसेवा

मानवी जीवन सुरक्षित राहण्याबरोबरच पर्यावरणाचा वेळीच -हास रोखून संरक्षणाच्या दृष्टीने वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी रुई (ता.हातकणंगले) येथील आभार फाटा सहारा नगरच्या हिरकणी महिला ग्रामसंघाने पुढाकार घेतला आहे. उद्योगपती रमेश पोवार (कॅलेफोर्निया) यांच्या आर्थिक पाठबळातून पट्टणकोडोली प्रभागातून ग्रामसंघामार्फत विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रुई सहारा नगरच्या १८ महिला बचत गटांना मोफत औषधी वृक्षांचे वाटप करण्यात आले. यावेळी महिलांनी वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी एकजुटीने कार्यरत राहण्याचा निर्धार केला.

ग्रामीण भागातील महिलांना संघटीत करुन त्यांच्यामध्ये आर्थिक बचतीची सवय लावून आणि आर्थिक, सामाजिक स्वावलंबनाची जाणीव निर्माण होऊन त्या आत्मनिर्भर होण्यासाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पट्टणकोडोली प्रभागात हिरकणी महिला ग्रामसंघ कार्यरत आहे. या ग्रामसंघाच्या माध्यमातून गारमेंट, यंञमाग, शेती यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे सबलीकरण आणि सबलीकरण होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक विविध प्रयत्न केले जात आहेत.

आता याही पुढचे एक पाऊल म्हणून वेळीच पर्यावरणाचा -हास रोखून वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे, चांगल्या आरोग्यासाठी औषधी वृक्षांचा वापर करणे या अनुषंगाने हिरकणी महिला ग्रामसंघाने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकताच उद्योगपती रमेश पोवार (कॅलेफोर्निया) यांच्या आर्थिक पाठबळातून ग्रामसंघाच्या १८ महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांना श्रीमती सुधाताई पोवार, सौ.लता लोकरे, जेष्ठ समाजसेवक विनायक गद्रे, सौ.विनया गद्रे, ब्रम्हाकुमारी माधवी बहेनजी, ग्रामसंघाचे तालुका समन्वयक विश्वजित सुर्यवंशी, रुईच्या सरपंच सौ‌.शकिला कन्नुरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोफत औषधी वृक्षांचे वाटप करण्यात आले.यामध्ये शेवगा, कडीपत्ता, पपई, आवळा, अडुळसा, गवती चहा, गुळवेल, पेरु,  पारिजातक, रामफळ, बेल, जांभूळ, लिंबू, कडूलिंब अशा विविध औषधी व फळ रोपांचा समावेश आहे. तसेच धरणगुत्तीच्या अरुंधती पाटील यांच्यावतीने रोपांच्या चांगल्या वाढीसाठी खत वाटप करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतात दैनंदिन जीवनात चांगल्या आरोग्यासाठी औषधी वृक्षांचे महत्त्व पटवून देत वृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे ,असे आवाहन केले.यावेळी सेवा भारती हॉस्पिटलच्या डॉ.दिप्ती लाटा यांनी महिलांच्या आरोग्याची काळजी संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास रुई गावच्या सीआरपी शितल वाघमारे, पुनम मुरचुटे, श्रीमती अंजली जोशीराव, सौ.लता गड्डम ,ओम हॅपी होमच्या सौ.लावण्या रापोल, अब्दुललाटच्या ग्रा.पं.सदस्या सौ.वर्षा पाटील,विद्योदय मुक्तांगण परिवारच्या सौ.सार्शा माळी, माजी सरपंच अनिता कुंभार, ग्रा.पं.सदस्य संदीप दोरुगडे यांच्यासह रुई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी, अंगणवाडी सेविका, विविध महिला बचत गटाच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी हिरकणी महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा पुजा भोसले, सचिव ज्योती कोष्टी, कोषाध्यक्षा महानंदा छप्रे, लिपिका श्रीमती उमा बोगा, मेहेक कवठे, वैशाली बेनाडे, सुमन संकेश्वरी यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.