इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या पंचवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी सुषमा दातार आणि उपाध्यक्षपदी काशिनाथ जगदाळे यांची निवड करण्यात आली. तर कार्यवाहपदी प्रा.मोहन पुजारी, सहकार्यवाहपदी डॉ.सुजित सौंदत्तीकर यांची निवड झाली. संस्थेच्या ज्येष्ठ संचालक हर्षदा मराठे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळ सदस्यांच्या बैठकीत सर्वानुमते पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
आपटे वाचन मंदिराच्या संचालक मंडळाच्या ११ जागांची २०२५ ते २०३० या कालावधीसाठी बिनविरोध निवडणूक झाली. निवडणूक अधिकारी म्हणून विजय कामत यांनी काम पाहिले. संस्थेच्या वार्षिक सभेत नवनिर्वाचित संचालकांची नावे जाहीर केल्यावर पदाधिकारी निवडीसाठी बैठक झाली.
यावेळी नवीन संचालक मंडळात वरील पदाधिकार्यांसोबत अँड.स्वानंद कुलकर्णी, हर्षदा मराठे, संजय सातपुते, राजेंद्र घोडके, बाळासाहेब कलागते, मीनाक्षी तंगडी, अभिजीत होगाडे यांची संचालक तर स्वीकृत संचालक म्हणून माया कुलकर्णी, प्रशांत बापट आणि श्रीकांत चंगेडिया यांची निवड करण्यात आली.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक डॉ.अशोकराव सौंदत्तीकर यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळ आणि पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या. नुतन अध्यक्ष सुषमा दातार यांनी ग्रंथालयाच्या सर्व सभासदांनी दर्शविलेल्या विश्वासाला पात्र राहून वाचन संस्कृती रुजविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
