पुणे / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात पुण्याच्या विकासाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पुण्याच्या उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी शहराच्या विकासात बाधा ठरत असल्याचं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी वापरलेल्या दादागिरी या शब्दामुळे त्यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे होता? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे.
पुण्यात दोन दादा आहेत, पहिले म्हणजे पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे पुण्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील. दोन्ही नेते पुण्यातून असल्याने आता फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे होता? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमात दादागिरी या शब्दावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी झाल्याचं बघायला मिळालं होतं. फडणवीसांनी चंद्रकांत पाटलांचा उल्लेख दादागिरी न करणारे दादा, असा उल्लेख केला होता. यावरून अजित पवारांनी त्याच व्यासपीठावरून चंद्रकांत पाटलांना टोला लगावला होता.
या सर्व घडामोडीनंतर फडणवीसांनी पुण्याच्या उद्योगक्षेत्रात घुसलेल्या दादागिरीवर भाष्य केलं आहे. एकीकडे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यात ते हिंजवडीच्या सरपंचांना झापताना दिसून आले होते. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या वक्तव्याचे विविध अर्थ काढले जात आहेत. पुणे महानगर प्रदेश ग्रोथहबच्या शुभारंभ कार्यक्रमात फडणवीसांनी हे वक्तव्य केलं.
देवेंद्र फडणवीस नक्की म्हणाले? पुण्यातील उद्योग जगताशी संबंधित लोकांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, ”उद्योग क्षेत्रात, व्यापाऱ्यात आपल्याला मोठ्या प्रमाणात दबाव पाहायला मिळत आहे. आमचीच माणसं घ्या, आमच्याकडून खरेदी करा, आम्हालाच कंत्राट द्या, आम्ही म्हणतो, त्याच रेटने काम द्या, ही मानसिकता जर आपण संपवली नाही, तर पुण्याचा विकास पुढे होऊ शकत नाही. आज पुण्याचा विकासामधला सर्वात मोठा अडथळा काही असेल, तर ती याठिकाणी घुसलेली दादागिरी आहे. ती गुंतवणूकदारांना काय परवडणार आहे? याचा निर्णय करू देत नाही.”
