मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनी दिलेल्या निमंत्रण सोहळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही? याची चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, राज ठाकरे यांनी जयंत पाटील यांच्या निमंत्रणाचा आदर राखत शेतकरी कामगार पक्षाच्या रॅलीला उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे शेकापच्या व्यासपीठावर एकाचवेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊत दिसून आल्याने पुन्हा एकदा राजकीय भूवया उंचावल्या. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार जयंत पाटील यांनी संजय राऊत आणि राज ठाकरे यांना रॅलीसाठी निमंत्रण दिले होते.
मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याने वर्धापन दिनाला बोलावलं
या संदर्भात बोलताना माजी आमदार जयंत पाटील म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यक्रमाला राज ठाकरे येत असल्याने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एक असल्याने त्यांना वर्धापन दिनाला बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की राज ठाकरे महाविकास आघाडीचा घटक नसले तरी आम्ही मराठीच्या मुद्द्यावर एक आहोत. ते पुढे म्हणाले की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठीसाठी घेतलेल्या भूमिकेमुळे विरोधकांची ताकद वाढली आहे. शेतकरी कामगार पक्षातून नेते इतर पक्षात गेले असले तरी कार्यकर्ते पक्षासोबत खंबीर असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र
दुसरीकडे हिंदी सक्तीचा वरवंटा झुगारून दिल्यानंतर मराठी विजयी मेळाव्याला माजी आमदार जयंत पाटील यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. याच कार्यक्रमांमध्ये तब्बल वीस वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. त्यानंतर राजकीय युतीची पण चर्चा रंगली. मात्र, राज ठाकरे यांनी युती संदर्भात कोणताही चकार शब्द न काढण्याचा आदेश आपल्या पक्षातील नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तसेच प्रवक्त्यांना दिला आहे. यानंतर 22 दिवसांनी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस पार पाडला. या वाढदिवसाला मात्र राज ठाकरे स्वत:हून मातोश्रीवर गेले. त्यामुळे हा सुद्धा हा राजकीय सुखद धक्का होता. त्यामुळे राज ठाकरे यांची बदलती भूमिका विरोधकांना बळ देणारी असल्याचे बोलले जात आहे.
