इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
नांदणी मठातील माधुरी हत्ती परत मिळवण्यासाठी तसेच जिओ व रिलायन्स कंपनीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीसाठी सकल जैन समाज इचलकरंजी व भ. महावीर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने शुक्रवार, दि. १ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता महावीर जैन भवन, मेन रोड, बँक ऑफ बडोदा मागे, इचलकरंजी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर प्रांताना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती सकळ जैन समाजातर्फे देण्यात आली.माधुरी उर्फ महादेवी हत्ती हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे प्रतीक असून सर्वधर्मीयांच्या भावना या घटनेशी जोडलेल्या आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून मठात योग्य प्रकारे सेवा होऊनही त्यांना वनतारा येथे पाठवण्याचा निर्णय झाला, या विरोधात तसेच रिलायन्स व जिओच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीनंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून सर्व समाजबांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गुंडांप्पा रोजे व भगवान महावीर जन्मकल्याणक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
या आंदोलनातून नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यात येणार असून, शांततेच्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
