नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
जर्मनीच्या दोन वेळच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या लॉरा डाहलमीयर हिचा पाकिस्तानमधील काराकोरम पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहण करताना दुर्दैवी मृत्यू झाला. लैला पीक या अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या शिखरावर चढाई करत असताना, 31 वर्षांची डाहलमीयर माउंटन स्लाइड अर्थात डोंगरातील खचलेल्या भागाचा भूस्खलनच्या झपाट्यात आली आणि तिच्यावर मोठमोठ्या खडकांचा मारा झाला. या दुर्घटनेनंतर दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती लॉरा डहलमेयर हिचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला. तिच्यासोबत नक्की काय झालं हे जाणून घेऊयात…
नक्की काय झालं?
ही दुर्घटना सुमारे 18,700 फूट उंचीवर घडली. डाहलमीयर तिच्या रोप पार्टनरसोबत होती, परंतु अपघातानंतर तिला शोधणे अत्यंत अवघड गेले. बचाव पथक, सैन्य हेलिकॉप्टर आणि स्थानिक पर्वतारोहकांच्या प्रयत्नांनंतरही तिचे शव सापडले नाही. त्यामुळे, डाहलमीयरला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती तिच्या टीमने अधिकृत निवेदनात दिली आहे. अत्यंत खराब हवामान आणि उंचीवरील कठीण परिस्थितींमुळे शोधकार्यात अडथळा आला असे त्यांनी त्या निवेदनात सांगितले आहे.
अनुभवी गिर्यारोहक होती लॉरा पण, तरीही…
लॉरा डाहलमीयर ही एक अनुभवी पर्वतारोहक होती. ती जूनच्या शेवटीपासून उत्तर पाकिस्तानात होती आणि ग्रेट ट्रांगो टॉवर सारख्या कठीण शिखरावर आधीच चढाई पूर्ण केली होती. मात्र, लैला पीक हे एक अत्यंत धोकादायक आणि कठीण समजले जाणारे शिखर आहे, जिथे आजवर फक्त सातच गिर्यारोहक यशस्वी चढाई करू शकले आहेत. अपघाताच्या आठवड्यात तिथे सतत पाऊस, जोरदार वारे आणि दाट ढग असल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती. यामुळे अनुभवी गिर्यारोहक असूनही लॉरा डाहलमीयरचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं
लॉरा डाहलमीयर हिने 2018 च्या प्योंगचांग (दक्षिण कोरिया) हिवाळी ऑलिम्पिकमध्ये एक स्प्रिंट आणि दुसरं परस्यूट प्रकारात अशी दोन सुवर्णपदकं जिंकली होती. या शिवाय, तिने इंडिव्हिज्युअल इव्हेंटमध्ये कांस्य पदकही पटकावलं होतं. ती जर्मनीच्या सर्वश्रेष्ठ महिला बायथलॉन ॲथलीट्सपैकी एक होती. मे 2019 मध्ये तिने निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्यानंतर ती साहसी खेळांमध्ये सक्रिय झाली होती. एक अतिशय प्रतिभावान आणि यशस्वी ॲथलीट, लॉरा डाहलमीयर हिचा जीव तिच्या आवडीच्या साहसी खेळामुळे गेला. अनुभवी असूनही, निसर्गाच्या ताकदीपुढे कोणीही असहाय्य ठरू शकतो, हेच या दुर्घटनेतून दिसून येते.
