मालेगाव / महान कार्य वृत्तसेवा
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाला आज जवळपास 17 वर्षे पूर्ण होत आहेत. भिक्खू चौकात घडलेल्या या स्फोटात सहा निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनंतर आज (31 जुलै) मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात जाहीर करण्यात आला. या खटल्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी एनआयएने केली होती. त्यामुळे आजच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. आता या प्रकरणातील सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर रमेश शिवाजी उपाध्ये, समीर शरद कुलकर्णी, अजय एकनाथ राहिरकर, प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर उदयभान धर द्विवेदी, सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
2008 मध्ये मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात आज न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. जवळपास 17 वर्षांनंतर आलेल्या या निकालानंतर कोर्टात सर्व आरोपी भावूक झाले. समीर कुलकर्णी यांना निकाल ऐकवताच अश्रू अनावर झाले. ”17 वर्ष आम्ही आरोपी नव्हे, तर पिडीत होतो. आज आमचा पुनर्जन्म झाला,” असे ते म्हणाले. कोर्टात आरोपींच्या पिंजऱ्यात बसलेले इतर सहा आरोपीही अत्यंत भावनिक झाले होते. त्यांनी एकमेकांना मिठी मारत, हात हातात घेऊन भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर?
निकालानंतर आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर भावूक झाल्या. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, ”मी माणुसकीचं नातं आणि न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवून इथे आले होते. पण माझं आयुष्य उध्वस्त करण्यात आलं. 13 दिवस मला अमानुष टॉर्चर करण्यात आलं. 17 वर्षे मी अपमान सहन केला. स्वत:च्याच देशात मला आतंकवादी ठरवण्यात आलं. ज्यांनी मला या अवस्थेत आणलं, त्यांच्या विषयी मी काही बोलणार नाही. संन्यासी असूनही मी सतत मरण अनुभवत होते. देवाला कलंकित करण्यात आले. माझं म्हणणं ऐकल्याबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल मी न्यायालयाची मनापासून आभारी आहे,” असे त्या म्हणाल्या.
न्यायालयाने नेमकं काय सांगितलं?
बॉम्ब ब्लास्ट झाल्याचं सरकारी पक्षानं सिद्ध केलं. पण ब्लास्ट स्कूटरमध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचं न्यायालयाने सांगितलं. तपासात अनेक त्रुटी होत्या. या सगळ्या त्रुटीचं वाचन देखील न्यायालयात करण्यात आले. पंचनामा योग्य नव्हता. जागेवरून हातांचे ठसे जप्त करण्यात आले नाही, असं निरिक्षणही न्यायालयाने नोंदवलं. चेसीस नंबर दुचाकीचा देखील कधी रिकव्हर करण्यात आला नाही. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर दुचाकीची मालक होती हे देखील स्पष्ट नाही, असं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. बैठकांसंदर्भातही तपास यंत्रणेचे दाव्यांवर न्यायालयाचं समाधान झालं नाही. आधी लावलेला मोक्कानंतर मागे घेतल्याने याअंतर्गत सगळे जबाब निरर्थक असल्याचं न्यायालयाने सांगितलं. ळअझ्अ साठी घेण्यात आलेली मान्यता चुकीची आहे. त्यामुळे ळअझ्अ लागू होत नाही. लष्करी अधिकारी असलेल्या कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी घेण्यात आलेल्या मान्यतेवरदेखील न्यायालयाकडून सवाल उपस्थित करण्यात आले. आरडीएक्स कर्नल प्रसाद पुरोहितांनी आणलं याचा पुरावा नाही, असंही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. सगळ्या आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.
