Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा आणि विधानपरिषदेत अधिवेशनकाळात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने टीकेच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार की नाही, याचा लवकरच फैसला होणार आहे. आज राज्यमंत्रिमंडळाची बैठक आहे. त्यापूर्वी माणिकराव कोकाटे आपल्या मुलीसह मंत्रालयात आले होते. त्यांनी अजित पवार यांच्या अँटी चेंबरमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अँटी चेंबरमध्ये झालेल्या चर्चेवेळी अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांची खरडपट्टी काढल्याचे समजते.

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांना स्पष्टपणे नाराजी बोलून दाखवली. कोकाटे तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटल्याचे समजते. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी झाल्या प्रकाराबद्दल अजित पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. पुढील काळात अशा बाबी घडणार, असे आश्वासनही दिले. यानंतर थोडीफार जुजबी चर्चा होऊन अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक संपली. यानंतर अजित पवारांच्या दालनात प्री-कॅबिनेट बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांच्या दालनात जमले आहेत. आता थोड्याचवेळात अजित पवार हे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय जाहीर करु शकतात. माणिकराव कोकाटे यांच्या सभागृहात ऑनलाईन रमी खेळणे आणि ‘शासन भिकारी आहे’ या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे अजितदादांवर कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता. माणिकराव कोकाटे यांच्या कृषीमंत्रिपदाची राजीनामा घेऊ नये, अशी मागणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते मंत्रालयात आले होते. या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. त्यावेळी अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांना प्रतिसवाल केला. किती वेळा चुका करणार आणि किती वेळा माफ करायचं? आता राजीनामा नको म्हणून आपण आलात. मात्र, ज्यावेळी मी स्वत:हून मंत्रिपद दिलं त्यावेळी कुणीही आलं नव्हतं. सतत चुका होतं असल्यामुळे आता माफी नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडल्याचे समजते. त्यामुळे आता पुढे काय होणार, याची उत्सुकता राजकीय वतुर्ळा लागली आहे.