Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मढ बेटाला वर्सोव्याशी जोडणाऱ्या केबल-स्टेड फ्यायओव्हरसमोरील परवानग्यांची सगळी आव्हानं आता संपली आहेत. कारण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला आता केंद्र सरकारकडूनही मंजुरी मिळाली आहे. हा पूल उभारण्यासाठी गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली होती. त्यानंतर पालिकेने पर्यावरण मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे शिफारस केली होती. दरम्यान, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामान बदल विभागाने या पुलाच्या उभारणीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला आता गती मिळेल.

सध्या मढ ते वर्सोवा प्रवास करण्यासाठी 45 ते 90 मिनिटे लागतात. मात्र, मढ बेट ते वर्सोवा पूल बांधल्यानंतर हे अंतर पार करण्यासाठी केवळ 5 मिनिटं लागतील. सध्या तिथे जाण्यासाठी रस्त्याचा मार्ग उपलब्ध नाही. गेल्या वर्षी मार्च महिन्यात या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. तसेच सप्टेंबरमध्ये कामाचे आदेश देण्यात आले होते. सुरुवातीला या प्रकल्पासाठी 1,800 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च जाहीर केला होता. मात्र, आता या प्रकल्पासाठी 2,395 कोटी रुपये इतका खर्च होईल, असं सांगण्यात आलं आहे.