मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
राज्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले. मागील काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, राज यांनी उद्धव यांची मातोश्रीवर भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीत जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत काय चर्चा झाली, याची माहिती समोर आली आहे.
त्रिभाषा सूत्री सक्तीचा जीआरचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी विजय मेळावा साजरा करण्यात आला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळपास 20 वर्षानंतर राजकीय मंचावर पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांचा आज 65 वा वाढदिवस आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर शिवसैनिकांची गर्दी उसळली आहे. त्यातच आज राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जात उद्धव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीमध्ये चर्चा झाली.
राज यांच्याकडून बाळासाहेबांना वंदन…
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून, सकाळपासूनच विविध पक्षांचे कार्यकर्ते, नेते, आणि समर्थक शुभेच्छा देण्यासाठी ‘मातोश्री’वर गर्दी करत होते. याच दरम्यान, दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे स्वत: मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काही मिनिटांपर्यंत दोघांमध्ये चर्चाही झाली. उद्धव आणि राज यांच्यात मातोश्री बंगल्यात जवळपास 25 मिनिटे चर्चा झाली. यावेळी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते. मातोश्रीत गेल्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले.
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बैठकीबाबत संजय राऊत यांनी सांगितले की, आज दोन भाऊ भेटले, दोघांनी एकमेकांना अलिंगन दिले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात गप्पा झाल्या. त्याशिवाय, दोन्ही नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत गेले. त्या ठिकाणी या दोघांमध्ये बाळासाहेबांनी काढलेल्या व्यगंचित्रांवर चर्चा केली. त्याशिवाय, दोघांनीदेखील जुन्या आठवणींना उजाळा दिला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी म्हटले की, आज दोन पक्षांचे नेते भेटले नाहीत तर भाऊ भेटले आहेत. दोन्ही भावांचे नातं आणखी दृढ होतंय, याचा आनंद आहे. आता, यापुढे जे होईल ते चांगले होईल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
