Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढिदवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज  (दि. 27 जुलै) मातोश्री निवासस्थानी पोहोचले. यावेळी राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि दोन्ही भावांची गळाभेट देखील झाली. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वी ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्‌‍यावरुन एकत्र आलेला असताना आता दोघांची मातोश्रीवर भेट झालीये. त्यामुळे राजकीय वतुर्ळात देखील चर्चेला उधाण आलंय. मात्र, यावेळी राज ठाकरेंच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलंय.

राज ठाकरेंकडून मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा तर दिल्याच मात्र, यावेळी त्यांच्या आणखी एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं. राज ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे ज्या खुर्चीवर बसायचे, त्या खुर्चीला अभिवादन केलंय. विशेष म्हणजे राज ठाकरे बऱ्याच वर्षांनी मातोश्रीवर गेलेले पाहायला मिळाले आहेत. मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे अपरिहार्य कारणांसाठी मातोश्रीवर जायचे. मात्र, आज ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मातोश्रीवर गेले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या या कृतीला विशेष राजकीय अर्थ असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार ?

काही आठवड्यांपूर्वी ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्‌‍यावरुन एकत्र आलेले पाहायला मिळाले होते. तेव्हापासून किंवा त्या अगोदरच्या काही आठवड्यांपासून ठाकरे बंधू मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मराठीच्या मुद्द्‌‍यावरुन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू निवडणूक एकत्र लढतील, असं बोललं जाऊ लागलं. मात्र, मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वक्तव्यानं युती होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत आम्ही एकत्रच आहोत, या लाईनवर ठाम राहिलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत की नाही? या प्रश्नाचं उत्तर पुढील काही आठवड्यांमध्ये मिळेल, असं बोललं जातंय.