Spread the love

राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचताच भास्कर जाधव काय काय म्हणाले?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

हिंदी सक्तीचा वरवंटा उखडून फेकल्यानंतर याच महिन्यात 5 जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्रित आले. त्यांचा एकत्रित मराठी विजय मेळावा महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाला सुखद आनंद देणारा ठरला. त्या घटनेला अवघे 22 दिवस होत नाही तोवर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिनी शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीच्या प्रांगणामध्ये पोहोचले. यावेळी शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये आनंदाचे भरता आलं. राज ठाकरे मातोश्रीवर येणार असल्याची चाहूल लागताच शिवसैनिक आणि मनसैनिकांनी मातोश्रीच्या प्रांगणामध्ये गर्दी केली होती. राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचं गाडीजवळ जाऊन स्वागत केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांची गळाभेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. दोन्ही बंधूमध्ये जवळपास 20 मिनिटे भेट झाली. दरम्यान, राज यांनी मातोश्रीवर येऊन वाढदिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यानंद झाल्याचे सांगितले.

या घटनेनं दुभंगलेला महाराष्ट्र एकसंध झाला दोन बंधूंची झालेली भेट ही पुन्हा एकदा आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्यावर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.  ते म्हणाले की दोन्ही भावांनी न बोलता करून दाखवलं. ही भविष्याची नांदी असल्याचे भास्कर जाधव म्हणाले. या घटनेनं दुभंगलेला महाराष्ट्र एकसंध झाल्याचे त्यांनी सांगितलं. आजच्यासारखा आनंदाचा दिवस असू शकत नाही. राज ठाकरे यापूर्वी उद्धव ठाकरे यांचं ऑपरेशन झाल्यानंतर आले होते. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे सुद्धा हयात होते असं भास्कर जाधव म्हणाले. मात्र या घटनेला वीस वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे आजचा दिवस मराठी माणसांसाठी आनंदाचा, प्रेरणेचा दिवस असल्याचं ते म्हणाले. दरम्यान, युतीच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की ही चर्चा सकाळ संध्याकाळ करायचे असते का? आजचा दिवस हा आनंदही असल्याचं त्यांनी नमूद केलं.