जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय, कोण आहेत प्रांजल खेवलकर?
पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुण्यातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या रेव्ह पार्टीत कोकेन आणि गांजा या अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान प्रांजल खेवलकर कोण आहेत, याबाबतची चर्चा रंगली आहे.
कोण आहेत प्रांजल खेवलकर?
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे ते दुसरे पती आहेत, पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं. सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंबीयांचं मुक्ताईनगरमध्ये वास्तव्य आहे. प्राजंल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून लांब आहेत. खेवलकर रिअल इस्टेट, इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक आहे. त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहितीही समोर आली आहे, पुण्यात या रेव्ह पार्टीमध्ये सापडल्याने मोठ्या प्रमाणावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
प्रांजल खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन कार चर्चेत
राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या जावई प्रांजल खेलवलकर या पूर्वीही एका कारणासाठी चर्चेत आले होते. यात खेलवलकरांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार वादात सापडली होती. या कारची चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाल्याचा आरोप करत ती कार जप्त करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करत अनेक आरोप केले होते.
अंजली दमानिया यांनी खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेलवलकर यांची एमएच 19 एक्यू 7800 ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता. जळगाव आरटीओमध्ये या गाडीची नोंदणी झाली असून, सदर गाडीला पासिंग मिळाले आहे. मात्र, या आलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. हलक्या वाहनांच्या (एलएमव्ही) श्रेणीत या कारची नोंदणी करण्यात आली होती. शिवाय, ॲम्बेसिडर लिमोझिन कारव्यतिरिक्त अन्य लिमोझिन कारना देशात परवानगी नसल्याचा दावाही दमानिया यांनी केला होता.
प्रांजल खेवलकरांच्या हडपसरच्या बंगल्यावर छापा टाकला
पुणे पोलिसांकडून काहीवेळापूर्वीच रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकण्यात आला. याठिकाणी गेल्या काही वेळापासून पोलिसांकडून झाडाझडती सुरु आहे. पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रोहिणी खडसे यांच्या घराची झाडाझडती घेतली जात आहे. दरम्यान, रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर प्रांजल खेवलकर यांना हडपसर येथील त्यांच्या बंगल्यावर आणण्यात आले आहे.
