मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त राज्यभरातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय जवळीकीची चर्चा 2025 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा विषय ठरली आहे. दोघेही ठाकरे कुटुंबातील प्रमुख नेते असून, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या त्यांच्या पक्षांनी मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेतली आहे. 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केल्यानंतर दोघांमधील राजकीय आणि वैयक्तिक मतभेद सर्वश्रुत होते. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे त्यांच्यातील दुरावा कमी होताना दिसला.
विजयी मेळाव्यासाठी आले होते एकत्र
केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात हिंदी सक्तीचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्रात मोठा विरोध उभा राहिला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेच्या संरक्षणासाठी एकत्रितपणे आवाज उठवला. या मुद्द्यावर त्यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याची योजना आखली होती, परंतु सरकारने हा निर्णय मागे घेतल्यानंतर 5 जुलै 2025 रोजी वरळी येथील ऱ्एण्घब डोम येथे विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्यात दोघेही एकाच व्यासपीठावर आले, ज्याने त्यांच्या जवळीकीला नवे वळण मिळाले.
मराठी अस्मितेचा मुद्दा
दोघांनीही मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात, ”आमच्यातील आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,” असे विधान केले, तर राज ठाकरे यांनी, ”कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे,” असे सांगितले.
पालिका निवडणुकीचा प्रभाव?
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मराठी मतदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आणि सत्ताधारी महायुतीला आव्हान देण्यासाठी ही जवळीक महत्त्वाची मानली जाते. अद्याप ठाकरेंची शिवसेनाआणि मनसेच्या युतीबद्दल दोन्ही बाजुने कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
