मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहे. अशातच कोकाटे यांनी आज शनि शिंगणापूरच्या शनीदेवाच्या दर्शनासाठी धाव घेतली. जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांनी शिंगणापूरच्या शनीदेवाचं दर्शन घेतलं आणि पुजा अर्चना केली. त्यावरून आता रोहित पवारांनी कोकाटे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला असून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
’तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते, अशी टीका रोहित पवार यांनी कोकाटे यांच्यावर केली आहे. त्यावेळी त्यांनी कृषीमंत्र्यांना टोमणे देखील मारले.
स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषी विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो, असं रोहित पवार पोस्ट करत म्हणाले.
दरम्यान, शेतकऱ्याबाबत केलेलं वक्तव्य किंवा विधीमंडळात रमी खेळतानाचा त्यांचा व्हायरल व्हिडीओ यामुळे माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले होते. त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याने आता अजित पवार गटाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. अजित पवार कोकाटे यांच्याशी चर्चा करणार असून येत्या काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
तसेच आता कोकाटे यांच्या ऐवजी पुन्हा धनंजय मुंडे यांना मंत्रीपद दिलं जातंय की काय? असा सवाल देखील विचारला जात आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा संदर्भातल्या घडामोडींवर बोलण्यात टाळलं. नंदुरबार दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री यांना या संदर्भात विचारले असता मुंबईला जाऊन या संदर्भाने बोलणार असल्याचा स्पष्ट केलं.
