पुणे / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते विविध विकासकामांची पाहणी करत आहेत. कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कामात अडथळा आणणाऱ्या लोकांवर ते संताप व्यक्त करताना दिसत आहेत. पुण्यातील हिंजवडी याठिकाणी एका रस्त्याची पाहणी करताना अजित पवार यांनी हिंजवडीच्या सरपंचावर संताप व्यक्त केला. महाराष्ट्राचं वाटोळं होतं आहे. हिंजवडी येथील आयटी पार्क बँगलोर हैदराबाद याठिकाणी जात असल्याचं त्यांनी म्हटलं.
या घटनेनंतर काही वेळाने अजित पवारांनी विकासकामांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. पण या पत्रकार परिषदेत देखील अजित पवार संतापताना दिसले. शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवारांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला. तसेच त्यांनी शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, त्यांना खडेबोल सुनावले.
खरं तर, जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय, चोर साला, अशा शब्दात टीका केली होती. सत्ताधारी आमदारानेच एका मंर्त्याबाबत अशाप्रकारे वक्तव्य केल्याने राजकीय वतुर्ळात विविध चर्चांना उधाण आलं. याच प्रकरणावर अजित पवारांना प्रश्न विचारला असता, ते पत्रकारांवर भडकले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
शरद सोनवणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, ”हा प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे का? मी सकाळपासून बाकीच्या विकासकामांबद्दल सांगतोय. ते दिलं सोडून आणि आमच्याकडे असं म्हटलं, तुमच्याकडे असं म्हटलं, असे प्रश्न विचारता. काही लोकं विकृत असतात, आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाहीत. मी नेहमी सांगतो. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने चालणारा आहे. त्यांनी आपल्याला शिकवण दिली आहे. जनता बारकाईने बघत असते. कोण कसं बोलतंय. जे योग्य बोलत नाहीत, त्याची दखल घेण्याचं काही कारण नाही. आम्ही हे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देऊ. त्यामुळे चांगल्या गोष्टीला उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. चुकीचे प्रकार होत असतील तर ते थांबवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न करत असेल, तर त्यावर पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”
शरद सोनवणे व्हायरल व्हिडीओत नक्की काय म्हणाले? व्हिडिओमध्ये आमदार शरद सोनवणे म्हणाले की, कसला मंत्री भेटलाय आपल्याला. आता मी मुख्यमंत्र्यांसमोर त्यांना उभे करणार आहे. सोबतच घोडेगाव प्रकल्प विकास अधिकारी प्रदीप देसाईंची सुद्धा झाडाझडती करणार आहे. आदिवासी खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांविषयी बोलताना शरद सोनवणे यांनी या भाषेचा वापर केला. व्हिडिओ समोर आल्यावर शरद सोनवणे यांनी यावर कबुली देखील दिली आहे. आपण मंत्र्यांविषयी नव्हे तर अधिकाऱ्यांना उद्देशून बोललो, अशी सारवासारव त्यांनी केली.
