इंजिनिअरच्या घरावर छापा, बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा संशय
नाशिक / महान कार्य वृत्तसेवा
जीएसटी विभागाच्या पुणे येथील गुप्तचर यंत्रणेने नाशिक शहरातील देवळाली परिसरात मोठी कारवाई केली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरावर छापा टाकून त्याच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई देवळाली गावाजवळील एका इमारतीत करण्यात आली. जिथे संबंधित सॉफ्टवेअर इंजिनिअर राहत होता. बनावट सॉफ्टवेअर तयार करून शासनाची फसवणूक केल्याच्या संशयावरून ही धडक कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
छाप्यादरम्यान संशयिताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड जप्त करण्यात आले आहेत. यामुळे केवळ आर्थिक फसवणूकच नव्हे, तर शस्त्रास्त्र बाळगण्याच्या गुन्ह्याचाही तपास सुरु करण्यात आला आहे. पुण्यातील जीएसटी गुप्तचर यंत्रणा ही कारवाई करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्याचा संशय होता. त्यामुळेच जीएसटी विभागाच्या पुणे येथील गुप्तचर यंत्रणेने संबंधित सोफ्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या घरी छापा टाकून ही कारवाई केली आहे. सध्या संबंधित सॉफ्टवेअर इंजिनिअरची कसून चौकशी केली जात आहे. आता चौकशीत नेमकी काय माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता एका महावितरण कर्मचाऱ्याला लोखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून पुण्याच्या ब्रोकरने कर्मचाऱ्यास तब्बल 23 लाख रुपये घेऊन गंडवले असून संशयिताने अनेकांना गंडा घातल्याचा संशय आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. नीलेश भास्कर टिळे असे संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत अविनाश मधुकर बागुल यांनी फिर्याद दिली आहे. संशयित टिळे याने सन 2022 मध्ये बागुल यांची भेट घेतली. गोल्फ क्लब भागात झालेल्या भेटीत संशयिताने बागुल यांचा विश्वास संपादन करत मार्केट मिरॅकल कंपनीमार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास विविध योजनांच्या माध्यमातून अधिकचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. त्यानुसार बागुल यांनी 6 जानेवारी 2022 ते 13 जून 2023 दरम्यान संशयिताकडे वेळोवेळी तब्बल 22 लाख 85 हजार रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर मात्र दोन वर्षे उलटूनही बागुल यांच्या पदरात परतावा व गुंतवणुकीची रक्कम न पडल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
