Spread the love

सांगली / महान कार्य वृत्तसेवा

सांगली जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. आज (26 जुलै) सकाळी देखील संततधार पावसाचा जोर कायम आहे. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रात्रीपासून अतिवृष्टी होत असून चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढवत तो 10260 क्युसेक विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वक्रद्वाराद्वारे 8630 क्युसेक्स व विद्युतगृहातून चालू असणारा 1630 क्युसेक असा एकूण 10260 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडले

दुसरीकडे, कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट उघडून 16,565 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण 18,665 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिराळा तालुक्यासह वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाच दिवसापासून पावसाने उघडीप  होती. मात्र गेल्या चोवीस तासात पाथरपुंजमध्ये झालेल्या पावसाने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.