कोल्हापूर परिसरातील देह विक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहक असे 24 जण पकडले ; पण कारवाई शून्य ; ‘ अर्थपूर्ण’ प्रकरणानंतर प्रकरण दडपलं ; मिनी आमदाराची शिष्टाई?
कुंभोज / महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले पासून जवळ असलेल्या कुंभोज जवळ रिसॉर्टच्या नावाखाली कुठनखाना सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके यांनी कारवाई केली. 16 जुलै रोजी मध्यरात्री ही कारवाई झाली. परंतु या प्रकरणात कमालीची गोपनीयता पाळण्यात आली. वारणे पासून शिरोळ पर्यंत मिनी आमदार म्हणून मिरवणाऱ्या एकाने यात मोठी तोडपाणी करून प्रकरणावर पडदा टाकल्याची दबक्या आवाजातील चर्चा हातकणंगले पेठा भागात आहे.
इचलकरंजी येथील अभिजीत नरसिंह शिंदे यांच्या मालकीचे हे रिसॉर्ट असून त्याचा बड्या राजकीय नेत्यांशी सततचा संपर्क असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची ‘अर्थपूर्ण ‘ चर्चा अंती फारशी वाच्यता झाली नसल्याचे बोलले जात आहे.
पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्याकडे विचार केला असता, 24 लोकांच्या वरती गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी मोघमात सांगितले. हे खरे असले तरी 16 तारखेला मध्यरात्री ही घटना घडली. आज या घटनेला दहा दिवस झाले, पण साधी प्रेस नोट, बी-पार्ट माध्यमांपर्यंत पोहोचणार नाही याची खबरदारी घेतल्याचे दिसते. एरवी ठरवून केलेल्या कारवाईचे फोटो, प्रेस नोट माध्यमांपर्यंत पोचवून प्रसिद्धी मिळण्यासाठी हपापलेल्या पोलिसांनी या घटनेची माहिती दहा दिवसापासून कशासाठी लपवून ठेवली यामागील अर्थकरण काय ? असा उलट सुलट सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
तो मिनी आमदार कोण?
या प्रकरणांमध्ये स्वतःला मिनी आमदार अशी जाहिरात करणारा एक कार्यकर्ता या प्रकरणात पुढाकार घेतला आहे, असे कळते. त्यांनेच हातकणंगलेपासून जयसिंगपूरपर्यंत आणि बसवन्नाखिंडीत बसून सेटींग लावली, या प्रकरणावर ‘अर्थपूर्ण’ चर्चा घडवून प्रकरण मिटवल्याचे समजते. त्यामुळे हा मिनी आमदार कोण ? अशी चर्चा हातकणंगले, शिरोळ मध्ये आहे.
