Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

भारत आणि इंग्लंड अंडर-19 संघादरम्यान खेळवण्यात आलेली दोन सामन्यांची युवा कसोटी मालिका संपली आहे. दोन्ही सामने अनिर्णित राहिले, परंतु भारतीय युवा खेळाडूंनी येथे ज्या पद्धतीने कामगिरी केली ती उल्लेखनीय आहे. भारत विरुद्ध इंग्लंड अंडर-19 युथ टेस्ट सीरिजमध्ये भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे याने तुफानी फलंदाजी करत क्रिकेट इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. चेम्सफोर्डच्या मैदानावर त्याने न्यूजीलंडचा माजी कर्णधार आणि सध्या इंग्लंड संघाचा प्रशिक्षक असलेल्या ब्रेंडन मॅकुलमचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला आहे.

दुसऱ्या डावात म्हात्रेचा धमाका

20 ते 23 जुलै दरम्यान झालेल्या दुसऱ्या आणि अंतिम यूथ टेस्ट सामन्यात भारताच्या युवा संघाने जबरदस्त खेळ केला. सामन्याचा निकाल बरोबरीत सुटला असला तरी, आयुष म्हात्रेने दुसऱ्या डावात आक्रमक फटकेबाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्या डावात 80 धावांची खेळी करणाऱ्या म्हात्रेने दुसऱ्या डावात अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक झळकावलं आणि नंतर 64 व्या चेंडूवर शतक पूर्ण केलं. त्याने केवळ 80 चेंडूंत 126 धावा ठोकल्या, त्याचं वेळी स्ट्राइक रेट होता तब्बल 157.50.

206 धावांचा खेळ आणि नवा विक्रम

संपूर्ण सामन्यात आयुष म्हात्रेने एकूण 170 चेंडूंमध्ये 206 धावा केल्या. त्याच्या फलंदाजीचा स्ट्राइक रेट 121.17 इतका होता. यामुळेच त्याने मॅकुलमचा 2001 मध्ये केलेला विक्रम मोडून काढला.

मॅकुलमचा विक्रम पडला मागे

2001 साली न्यूजीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लिंकनमध्ये झालेल्या यूथ टेस्ट सामन्यात ब्रेंडन मॅकुलमने 200+ धावा करताना 108.41 चा स्ट्राइक रेट राखला होता. आता आयुष म्हात्रेने 121.17 च्या स्ट्राइक रेटने खेळ करत हा जुना विक्रम मोडीत काढला आणि युवा क्रिकेटमध्ये नवे मापदंड तयार केले.

युवा खेळाडूंसाठी प्रेरणा अजून फक्त 18 वर्षांचा असलेला आयुष म्हात्रे आता भारताच्या उदयोन्मुख क्रिकेटमधील एक मोठं नाव ठरत आहे. त्याची ही कामगिरी भारताच्या भविष्यासाठी अत्यंत आशादायक आहेत.