Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
गुरुवारी आलेली दीप अमावस्या आणि त्यानंतर सुरू होणारा श्रावण महिना या पार्श्वभूमीवर बाजारात नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली . धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या काळात मंदिरांमध्ये नारळ वाहण्यासह घरोघरी पूजा-अर्चा केली जाते. त्यामुळे बाजारपेठेत विविध प्रकारचे नारळ आणि कुमठा नारळ विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत.
साधारणतः १५ ते २५ रुपये दराने मिळणारा नारळ सध्या ३० ते ४० रुपयांपर्यंत विकला जात असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. कुमठा नारळ, जो विशेषतः धार्मिक कार्यांसाठी वापरला जातो, त्याचे दरही ३५ ते ४० रुपये इतके झाले आहेत. यामुळे सामान्य ग्राहकांवर आर्थिक ताण पडत असल्याची भावना आहे. “सणासुदीच्या काळात आवक कमी आणि पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने दर वाढणे अपरिहार्य आहे,” असे काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे. एकूणच, श्रावण महिन्याच्या प्रारंभीच बाजारात धार्मिक साहित्य आणि फळांच्या दरवाढीची झळ ग्राहकांना बसू लागली आहे. नारळाचे वाढलेले दर हे त्याचे  उदाहरण  आहे.