मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना काही सांगण्यात आलं नसून, चौकशीही झालेली नाही. त्यामुळे त्यांचा गैरसमज होणं साहजिक आहे. मीडियावर विश्वास ठेवून त्यांनी विधान केलेलं दिसत आहे असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या रमी खेळतानाच्या व्हायरल व्हिडीओवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आमच्यासाठी भुषणावह नाही असं म्हटलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी रमी खेळलेलो नाही आणि ते खेळणं योग्यही नाही. मी 25 वर्षांपासून विधानसभेत आहे. मला सर्व नियम, कायदे समजतात. विधानसभेत काय करावं, काय करु नये याची मला काळजी आहे. मी सर्व नियम पाळतो आणि आताही पाळले आहेत असंही ते म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं आहे?
”अतिशय चुकीचं आहे. विधानभवनात चर्चा सुरू असते तेव्हा आपलं कामकाज नसतानाही गांभीर्याने बसणं गरजेचं आहे. रमी खेळतानाचा व्हिडीओ याग्य नाही. त्यांनी खुलासा केला आहे की, मी रमी खेळत नव्हतो अचानक पॉप अप झालं. पण तरी सांगितलं असलं तरी हे आमच्यासाठी भुषणावह नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
”मी राजीनामा देण्यासारखं काय घडलं आहे?”
”मी राजीनामा देण्यासारखं काय घडलं आहे? मी काय विनयभंग केला आहे की, चोरी केली आहे, की शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतला आहे की माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्यांना कोर्टात खेचणार आहे, अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
”…तर मी राजीनामा सादर करणार”
”मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, विधानसभा अध्यक्ष या सर्वांना लेखी पत्र देणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पत्राच्या आधारे चौकशी करावी. जर मी ऑनलाइन रमी खेळत असेन आणि दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्यातील कोणीही निवेदन करावं. त्या क्षणी न थांबता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांकडे मी माझा राजीनामा सादर करेन,” असंही त्यांनी जाहीर करुन टाकलं.
‘कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही’
रमी खेळण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले, ”हा इतका छोटा विषय असताना इतका का लांबला मला माहिती नाही. मी यावर याआधीही खुलासा केला आहे. ऑनलाइन रमी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर कनेक्ट करावा लागतो, तसंच बँकेचं अकाऊंटही संलग्न करावं लागतं. त्याशिवाय ऑनलाइन रमी खेळता येत नाही. अशा प्रकारचं कोणतंही अकाऊंट किंवा मोबाईल नंबर कनेक्ट नाही. ज्या दिवसापासून ऑनलाइन रमी सुरु झालं आहे, त्या दिवसापासून एक एक रुपयाचीगी रमी खेळलेलो नाही. मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे आरोप बिनबुडाचा आणि चुकीचा आहे. या आरोपांमुळे महाराष्ट्रात माझी बदनामी झाली आहे”. कारण नसताना ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला, बदनामी केली आहे त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
”हाऊसमध्ये माझं काम होतं, लक्षवेधी होती. माझ्या ओएसडी किंवा इतरांकडून माहिती मिळवण्यासाठी फोन किंवा मेसेज करावा लागतो. त्यासाठी मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यानंतर त्यावर मोबाईल गेम पॉप अप झाला. एक एका सेकंदाला गेम येत असतात. मोबाईल नवा असल्याने मला तो स्कीप करता आला नाही. पण स्कीप केल्यानंतरचा व्हिडीओ समोर आलाच नाही. आपण 5 जीमध्ये असल्याने मोबाईलवर एकामागोमाग गेम पॉप अप होतात आणि ते स्कीप करावे लागतात. हा फक्त 18 सेकंदाचा व्हिडीओ आहे. त्यात मी स्कीप करण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढाच व्हिडीओ शूट करुन आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. माझा खेळण्याचा काही हेतू नव्हता. पूर्ण दाखवलं असतं तर काहीही तथ्य नसल्याचं लक्षात आलं असतं,” असंही त्यांनी सांगितलं.
