मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेत संधी न मिळालेल्या भारतीय फलंदाज सरफराज खानने आपल्या नव्या लूकने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सरफराज खानने आपलं वजन 17 किलो कमी केलं असून, त्याचा नवा लूक अनेकांसाठी भुवया उंचावणारा ठरला आहे. सरफराज खानवर त्याच्या वजनामुळे नेहमीच टीका करण्यात आली आहे. चांगली कामगिरी करत असतानाही संघात स्थान न मिळण्यास त्याचं वजनच कारणीभूत असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला आहे. दरम्यान सरफराज खानने सोशल मीडियावरुन आपला एक नवा फोटो शेअर करत सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं. यानंतर अनेकांनी त्याच्या मेहनतीचं कौतुक केलं आहे.
इंग्लंडचा माजी दिग्गज खेळाडू केविन पीटरसननेही सरफराज खानच्या नव्या लूकचं कौतुक केलं असून, यावेळी पृथ्वी शॉचा उल्लेख केला आहे. ”उत्कृष्ट प्रयत्न! खूप खूप अभिनंदन आणि मला खात्री आहे की यामुळे मैदानावर चांगली आणि अधिक सातत्यपूर्ण कामगिरी होईल. आपल्या प्राथमिकता ठरवण्यासाठी तू जो वेळ घालवला आहेस तो मला फार आवडला! एलएफजी! कोणीतरी पृथ्वीला हे दाखवू शकेल का? हे करता येतं! मजबूत शरीर, मजबूत मन!” असं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. नितीश कुमार रेड्डी जायबंदी झाल्याने कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे, तर दुसरीकडे चौथ्या कसोटी सामन्यातून अर्शदीप सिंग बाहेर गेला आहे. ”डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी उर्वरित दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर पडला आहे. नितीश मायदेशी परतेल. संघ लवकर बरं होण्यासाठी त्याला शुभेच्छा देत आहे,” असं बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या मालिकेत अद्याप न खेळलेला अर्शदीप सरावादरम्यान जखमी झाला आहे. आठवड्यात बेकेनहॅम येथे सराव सत्रादरम्यान नेटमध्ये गोलंदाजी करताना त्याच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. ”बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे,” असं निवेदनात म्हटले आहे. हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याला संघात घेण्यात आलं आहे. तो आधीच मँचेस्टरमध्ये संघासोबत जोडला गेला आहे.
