Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

जगदीप धनखड यांनी काल प्रकृती आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यामुळं आता भारतीय संविधानाच्या कलम 68 नुसार नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया सुरु होईल. उपराष्ट्रपतींची निवड प्रक्रिया कशी होते ते जाणून घेणं महत्त्वाचं आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जगदीप धनखड यांनी ऑगस्ट 2022 मध्ये व्यंकय्या नायडू यांच्यानंतर उपराष्ट्रपती पद स्वीकारलं होतं. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे जगदीप धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत.

संविधानाच्या कलम 68 नुसार उपराष्ट्रपती पद निवडीची प्रक्रिया आहे. कलम 68 (1) नुसार उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ संपंत आला अशेल तर त्यापूर्वी नव्या उपराष्ट्रपतींच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.  दुसरी तरतदू अशी आहे जर उपराष्ट्रपती पद मृत्यू, राजीनामा, पदावरुन हटवलं गेल्यानं रिक्त झाल्यास नव्या उपराष्ट्रपतींची नियुक्ती प्रक्रियेद्वारे केली जाते. उपराष्ट्रपतींची निवड करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा संविधानात दिलेली नाही.  कलम 68 नुसार जितक्या लवकर उपराष्ट्रपतींची निवड करणं शक्य आहे तितक्या लवकर ती करावी. जगदीप धनखड यांनी 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता, त्यांची अजून दोन वर्ष बाकी होती. मात्र, नव्या उपराष्ट्रपतींची निवड झाल्यानंतर ती पाच वर्षांसाठी असते.

उपराष्ट्रपती होण्यासाठी पात्रता

भारतीय संविधानाच्या कलम 66(3) अनुसार उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. त्यानं वयाची 35 वर्षे पूर्ण केलेली असावीत. तो राज्यसभेवर निवडून येण्यास पात्र असावा. भारत सरकार, कोणतंही राज्य सरकार किंवा इतर शासकीय प्राधिकरणात लाभाच्या पदावर नसावा.

उपराष्ट्रपतींची निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. आयोगाकडून निवडणुकीची अधिसूचना काढली जाते. उमेदवारी अर्जांची छाननी केली जाते. मतदान केलं जातं. त्यानंतर मतमोजणी करुन निकाल जाहीर केला जातो.

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार (संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य मिळून बनलेल्या निर्वाचक गणाच्या सदस्यांकडून निवडला जाईल) या निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं केलं जातं.

उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांकडून मतदान केलं जातं. लोकसभा आणि राज्यसभेतील राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केलेले सदस्य देखील यात मतदान करु शकतात. मतदारांना उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम नोंदवायचा असतो. जोपर्यंत उमेदवार बहुमतानं विजयी होत नाही तोपर्यंत मतमोजणी केली जाते.