मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
टेलिव्हिजन शोमधून जगभरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता मॅलकॉम-जमाल वार्नरचं वयाच्या 54व्या वर्षी निधन झालं आहे. अभिनेता कोस्टा रिका देशातील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला होता. त्याचवेळी तो समुद्रात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मॅलकॉमच्या चाहत्यांना आणि सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कोस्टा रिकाच्या कॅरिबियन किनाऱ्यावरील एका समुद्रकिनाऱ्यावर रविवारी दुपारी वॉर्नर बुडाला. अभिनेता व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी कोस्टा रिकाला गेला होता. त्याचवेळी तो पोहण्यासाठी समुद्रात गेला, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं तो खोल समुद्रात बुडाला.
तपास विभागानं त्यांच्या अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, अभिनेता मॅलकॉम आपल्या फॅमिलीसोबत कोस्टा रिकामधील कोक्लेस बीचवर गेला होता. समुद्रकिनाऱ्यावर फिरताना तो खोल समुद्रात गेला. तिथे तो लाटांच्या प्रवाहात अडकला. तिथून त्याला बाहेर येणं अशक्य झालं होतं. काही वेळातच त्याला बचाव पथकानं बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण, तोपर्यंत फार उशीर झालेला. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मॅलकॉम-जमाल वार्नरनं 1984 ते 1992 दरम्यान चाललेल्या प्रसिद्ध अमेरिकन सिटकॉम ‘द कॉस्बी शो’ मध्ये थिओ हक्स्टेबल ही व्यक्तिरेखा साकारली होती. या भूमिकेमुळे मॅलकॉमला जगभरात प्रसिद्धी मिळाली. 40 वर्षांच्या कारकिर्दीत दिग्गज अभिनेत्यानं टीव्ही शो आणि संगीत व्हिडीओंचे दिग्दर्शनही केलं आहे. तसेच, अनेक सिटकॉममध्येही काम केलं. त्यानं ‘माल्कम अँड एडी’ आणि ‘रीड बिटवीन द लाईन्स’ आणि ‘द रेसिडेंट’ या वैद्यकीय नाटकांमध्ये काम केलं आहे.
सर्वोत्कृष्ट पारंपारिक ‘आर अँड बी’ परफॉर्मन्ससाठी ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ‘हायडिंग इन प्लेन व्ह्यू’ या अल्बमसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट स्पोकन वर्ड पोएट्री अल्बमसाठी ग्रॅमी नामांकन देखील मिळालं. आठ सीझनमध्ये त्यांनी साकारलेल्या थियो हक्सटेबल पात्रासाठी माल्कम-जमाल यांना एमी नामांकन मिळालं. 1986 मध्ये त्यांनी ‘द कॉस्बी शो’च्या 197 भागांपैकी प्रत्येक भागात विनोदी भूमिकेत सहाय्यक अभिनेता म्हणून ओळख मिळवली.
