नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला 22 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. संघातील उपकर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो लॉर्ड्स कसोटीत क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात येऊ शकला नव्हता. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षणासाठी आला. मात्र, ऋषभला फलंदाजीला यावं लागलं. आता चौथ्या कसोटीत त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ऋषभ खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत असताना भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला मोलाचा सल्ला दिला आहे.
ऋषभ पंतने या मालिकेतील तिन्ही सामन्यात फलंदाजी करताना मोलाचं योगदान दिलं आहे. तिसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. दुसऱ्या डावात तो स्वस्तात बाद होऊन माघारी परतला होता. या सामन्यात त्याच्या तर्जनीला दुखापत झाली होती. सुरूवातीचे काही षटक यष्टीरक्षण केल्यानंतर त्याला मैदान सोडावं लागलं होतं. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलने यष्टीरक्षणाची जबाबदारी पार पाडली होती.
रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला
रवी शास्त्री म्हणाले, ”मला तरी हेच वाटतं की, तो जर यष्टीरक्षण करू शकत नसेल तर त्याने फलंदाज म्हणून मैदानात उतरू नये. हे योग्य ठरणार नाही. कारण फक्त फलंदाज म्हणून मैदानात उतरला तर त्याला क्षेत्ररक्षण करावं लागेल. जर तो क्षेत्ररक्षण करणार असेल तर परिस्थिती आणखी बिकट होईल. कारण यष्टीरक्षण करताना हातात ग्लोव्हज असतात. पण क्षेत्ररक्षण करताना कुठलंही संरक्षण नसेल, त्यामुळे दुखापतीची शक्यता आणखी वाढू शकते.” भारताचा कर्णधार शुबमन गिलने आधी सांगितलं होतं की, ऋषभ पंत चौथ्या कसोटीआधी पूर्णपणे फिट होईल. भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक रायन डे डोशेटने देखील ऋषभ पंतच्या दुखापतीबाबत अपडेट दिली होती. तो म्हणाला,” ऋषभने लॉर्ड्स कसोटीतील दोन्ही डावात फलंदाजी केली. त्याच्या बोटाच्या दुखापतीत आता सुधारणा झाली आहे. आम्ही आशा करतो की, तो मँचेस्टर कसोटीसाठी उपलब्ध असेल. तो फलंदाज म्हणून खेळणार, हे जवळजवळ निश्चित आहे. पण, यष्टीरक्षक म्हणून खेळणार की नाही, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.”
