Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

 मुंबई महापालिकेच्या सफाई व परिवहन खात्यातील प्रस्तावित कंत्राटीकरणाच्या विरोधात कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या 97 टक्के कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र, आज 17 जुलै रोजी कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी भेट देणार असून त्या भेटीत जे ठरेल, त्यानंतर संपाबाबत अंतिम निर्णय होणार आहे. या भेटीतून मार्ग न निघाल्यास परिवहन आणि सफाई या दोन्ही खात्यांतील कामगार संपावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईतील साफसफाईची कामे ठप्प पडण्याची भीती असून मुंबईची कचरा कोंडी होणार आहे.

मुंबई महापालिकेने 14 मे 2025 रोजी निविदा प्रसिद्ध करून सफाई खात्यातील कामकाजाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात आजपर्यंत कामगार संघटनांनी मेळावे, मोर्चे, निदर्शने केली. मात्र, संघटनांच्या या प्रयत्नांना प्रशासनाने आणि सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार कृती समितीने केले आहे. तसेच हे आंदोलन पगारवाढीसाठी नाही तर कामगारांच्या नोकऱ्यांवर गदा आणून सफाई खात्याचे संपूर्ण खासगीकरण करण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.

दरम्यान, मुंबई शहरातील 9 विभागातील सफाई कामगारांचा संपाबाबत कौल घेण्यात आला. इतर 15 विभागांतही कामगारांचा संपाच्या बाजूने कौल आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आझाद मैदानावर जमणार आहोत. त्यांच्याशी भेट होण्याची आशा असून या भेटीत जो निर्णय होईल, त्यावर संपाचा निर्णय घेणार असल्याचे कृती समितीचे रमाकांत बने यांनी सांगितले.