मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट 2016 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा मराठीतील सर्वात यशस्वी सिनेमा ठरला. सैराट सिनेमात अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरु यांची मुख्य भूमिका होती. मात्र, जेवढी चर्चा आर्ची आणि परश्याची झाली, तेवढीच चर्चा या सिनेमातील लंगड्याची झाली. अभिनेता तानाजी गळगुंडे याने या सिनेमात लंगड्याची भूमिका साकारली होती. दरम्यान, अभिनेता तानाजी गळगुंडे याने नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी त्याने वैयक्तिक आयुष्याबाबत मोठे खुलासे केले आहेत. अभिनेता तानाजी गळगुंडे काय काय म्हणाला? पाहूयात..
तानाजी गळगुंडे म्हणाला, सायकल मला पहिल्यापासून आवडायची. मी सायकलवर लय प्रवास केलाय. माझं कॉलेजचं लाईफ सगळं सायकलवर होतं. माझ्या गावात कॉलेज नव्हतं. इभब ला मी टेंभूर्णीमध्ये यावं लागलं. माझ्या गावापासून बेंबळे 2-3 किलोमीटर होतं. तिथून कॉलेज 10 ते 12 किलोमीटर होतं. हा 15 किलोमीटरचा प्रवास मी सायकलवर करायचो. त्या काळात मी नवीन सायकल घेतली होती. मधल्या काळात सैराट आला.. त्यामुळे मी पुण्यात आलो. नंतर माझ्या पायाच्या सर्जरी झाल्या. या सगळ्या गोंधळात सायकल सुटली होती. सध्या माझ्याकडे एक चांगली सायकल आहे. मी ही सायकल तीन वर्षापूर्वी घेतली होती. पुण्यातील माझी सगळी कामं.. पायाची ट्रीटमेंट असूद्या किंवा काहीही असूद्या.. सगळी कामं सायकलवर करतो.
पुढे बोलताना तानाजी गळगुंडे म्हणाला, माझ्या पायाच्या आत्तापर्यंत 7 सर्जरी झाल्या आहेत. माझे पाय मांडी आणि नगडीची हाडं पहिल्यापासूनच बेंड होती. जन्मत: होती किंवा जन्मानंतर झाली.. मला अजून माहिती नाही. माझी लहानपासून हाडं बेंड होती. आपल्या हाडांची वाढ 22-23 वर्षांनंतर संपून जाते. तोपर्यंत मला काही त्रास नव्हता. त्यानंतर मात्र मला पायाचा फार त्रास होऊ लागला. म्हाताऱ्या माणसासारखे माझे गुढगे सुजू लागले. चालता येत नव्हतं. पळालो तरी त्रास व्हायचा. मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांनी एक्स रे काढले. त्यातून समजलं की, माझे हाडं बेंड असल्यामुळे माझं पंजापासून खुब्यापर्यंत वजन यायचं. गुडघ्यावर वजन पडत नसायचं वाकडे असल्यामुळे.. आपलं वजन पंजावर आणि गुडघ्यावर विभागलेलं असायला हवं..ते विभागलेलं नसायचं. माझे खुब्यातील हाडं तिरके होऊन एकमेकांना घासायचे. त्यानंतर डॉक्टर म्हणाले, मांडीचे आणि गुडघ्याचं हाडं सरळ करावे लागतील. मग त्याच्या सात सर्जरी कराव्या लागल्या.
