पुणे / महान कार्य वृत्तसेवा
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं पोलिसांना दोन विदेश नागरिकांवर संशय आल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या बॅगांची झडती घेतली. यावेळी त्यांच्या बॅगमध्ये पोलिसांना नको तेच सापडलं आहे. संबंधित प्रकार पाहून पोलीस हादरून गेले. बॅग तपासले असता बॅगेत ठेवलेल्या चॉकलेट बॉक्समध्ये चक्क दुमिर्ळ साप, ससे आणि पोपट आढळले आहेत.
चॉकलेटच्या बॉक्समधून केल्या जाणाऱ्या तस्करीचा हा प्रकार पाहून पोलीसही हादरले. चॉकलेट बॉक्समधून एकूण 14 सापांची तस्करी केली जात होती. बेकायदेशीरपणे वन्यजीव प्राणी आणि पक्षांची तस्करी केल्याप्रकरणी पुणे कस्टम विभागाकडून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
आंतरराष्ट्रीय वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण असलेले 14 साप (ग्रीन ट्री पायथन), चार पोपट (ग्रीन आय पॅरेट) आणि सुमात्रात आढळणारे दोन दुर्मीळ ससे आरोपींकडून ताब्यात घेण्यात आले. तस्करी दरम्यान एका सापाचा मृत्यू झाला. वन्यजीवांच्या खरेदी-विक्रीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असल्याने त्यांची बेकायदा वाहतूक हा गुन्हा आहे. तरीही बँकॉकमधून दोन प्रवासी मंगळवारी रात्री दोन वाजता परदेशी वन्यजीव पुण्यात घेऊन आले. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शंका आल्याने बॅगेची तपासणी करण्यात आली यावेळी दोन प्रवाशांकडून खोक्यात लपविलेले साप, ससे आणि पोपट जप्त करण्यात आले. विमानतळावर जप्त केलेले वन्यजीव परदेशी आहेत. वन्यजीव तस्करीशी संबंधित आंतरराष्ट्रीय नियमांनुसार ताब्यात घेण्यात आलेले वन्यजीव ज्या देशातून आणले तिकडेच परत पाठवले जाणार आहेत.
