मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईच्या अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका 34 वर्षीय तरुणाने आपल्या सावत्र मुलीची हत्या केली आहे. नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने मुलीची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह थेट समुद्रात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने हत्येचं धक्कादायक कारण सांगितलं आहे.
अमायरा शेख असं हत्या झालेल्या चिमुकलीचं नाव आहे. तर इम्रान खानं असं आरोपी बापाचं नाव आहे. आरोपी इम्रानने गळा दाबून अमायराची हत्या केली. यानंतर त्याने मृतदेह समुद्रात फेकल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. मृत अमायरा ही आई-वडील आणि भावंडासोबत राहायची. आई नाझिया हिचा यापूर्वी दोघांसोबत घटस्फोट झाला होता. यानंतर तिने इम्रानसोबत तिसरं लग्न केले होते. नाझियाला एकूण पाच मुलं होती. अमायरा ही सगळ्यात लहान होती. ती रात्रीची लवकर झोपत नव्हती. सतत इम्रानचा मोबाइल घेऊन बसायची. यामुळे ती वैवाहिक जीवनात अडथळा ठरत असल्याचं इम्रानला वाटायचं.
तसेच, ती अनेकदा आपल्या वडिलांची आठवण काढायची. फोनवर त्याच्याशी गप्पा मारायची. त्यांना भेटण्याचा हट्ट करायची. यामुळे नाझिया आणि इम्रानच्या नात्यात ती अडसर ठरत असल्याचा समज इम्रानला होता. त्यामुळे त्याने सोमवारी रात्री आठच्या सुमारास अमायराला फिरवून आणण्याच्या बहाण्याने सोबत घेतले. तो पीडितेला घेऊन भाऊचा धक्का परिसरात गेला. याठिकाणी त्याने मुलीची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह समुद्रात फेकून दिला.
अमायराच्या हत्येनंतर इम्रान घरी आला. तेव्हा अमायराची आई तिला सगळीकडे शोधत होती. इम्रानही तिच्या शोधासाठी नाझियासोबत फिरू लागला. नाझियासोबत तक्रारीसाठीही तो पोलीस ठाण्यात देखील आला. मध्यरात्री पोलीस ठाण्यात येऊन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रारही दिली; मात्र मंगळवारी सकाळी एका मच्छीमाराला अमायराचा मृतदेह ससून डॉकजवळील समुद्रात सापडल्याने तिचा शोध थांबला. या प्रकरणी जेव्हा पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला. तेव्हा अमायरा बेपत्ता होण्याआधी इम्रानसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परिसरात 161 सीसीटीव्ही कॅमेरे तपासात शोध घेतला. तेव्हा आरोपी इम्रान अमायरासोबत असल्याचं दिसून आलं. यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत इम्रानला अटक केली. अटकेनंतर आरोपीनं हत्येची कबुली दिली. मुलगी रात्री झोपत नाही. सतत मोबाइल बघते. यामुळे वैवाहिक जीवनात अडथळा ठरते, या सगळ्या कारणामुळे आपण मुलीची हत्या केल्याचं त्याने सांगितलं. अँटॉप हिल पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
