Spread the love

गडचिरोली / महान कार्य वृत्तसेवा

स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही एका गावात सरकारी बस आली नव्हती, कदाचित यावर तुमचा विश्वास नाही, पण हो, महाराष्ट्रात असेच घडले आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम गावात एसटी बस सेवा सुरू झालीय, जो एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जात होता. बुधवारी पहिली एसटी अतिदुर्गम असलेल्या मरकणार गावात पोहोचली, तेव्हा स्थानिक लोकांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याचे स्वागत केले.

एसटीचा फायदा गावातील 1200 रहिवाशांना होणार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या एसटीचा फायदा मरकणार आणि आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे 1200 रहिवाशांना होणार आहे. गडचिरोली पोलिसांच्या प्रयत्नांमुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मरकणार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आदिवासी लोकसंख्या असलेला आणि नक्षलग्रस्त भागांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पायाभूत सोयीसुविधांची समस्या होती.

एसटीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांच्या हाती तिरंगा : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमदच्या पायथ्याशी असलेले मरकणार गाव हे नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला होता. बुधवारी ग्रामस्थांना पहिल्यांदाच त्याच परिसरात एसटी बस सेवा पाहता आली. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या राज्य परिवहन सेवेचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ तिरंगा घेऊन जमले होते, असे पोलीस निवेदनात म्हटले आहे. या सेवेचा फायदा 1200 हून अधिक रहिवाशांना होणार आहे, विशेषत: मरकणार, मुरुमभुशी, फुलणार, कोपर्शी, पोयारकोठी, गुंडूरवाही यांसारख्या गावांमधील रुग्ण, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना रहदारीसाठी एक साधन उपलब्ध झालंय. दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले आहेत.

काटेझर ते गडचिरोली अशी बससेवा सुरू : 1 जानेवारी 2025 रोजी गट्टा-गरदेवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि 27 एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली अशी बससेवा सुरू करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, गेल्या पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात 420.95 किमी लांबीचे 20 रस्ते आणि 60 पूल बांधण्यात आले आहेत.