मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मनसेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची 2020 साली गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्ररकरणातील दोन आरोपीं जेरबंद असून सुपारी घेणारा आरोपी ओसामा शेख अद्यापही फरार आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला यांच्यावर हत्येची सुपारी दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर जमील शेख यांच्या कुटुंबाबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत नजीब मुल्ला यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, महाराष्ट्रात किती गंभीर परिस्थिती होतेय. एखाद्या व्यक्तीला गोळी घालून ठार केले तरी चालते. एखादा अधिकारी चांगली चौकशी करत असेल तर त्याची बदली केली जाते. जर तुम्ही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असाल तर तुमच्यावर कारवाई होणार नाही. जमील शेख हे मनसेचे काम करत होते. नजीब मुल्ला जे अजित पवार यांचे जवळचे आहेत, त्यांनी शूटर्सला सांगून गोळ्या मारून खून केला. 2014 साली देखील डोळ्यात मिर्ची टाकून हल्ला करण्यात आला होता. नजीब मुल्लाविरोधात लढायचं नाही, म्हणून सांगण्यात आलं होतं. ठाण्यात अल तय्यब नावाचा नजीब मुल्लाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. लोकांना त्याने विस्थापित केलंय. जमील शेख आणि त्याचं कुटुंब हे लोकांसाठी लढत होते.
फडणवीस कारवाई करतील की नाही? 23 नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. नितीन नावाचे घ्धब अधिकारी या प्रकरणात चांगली चौकशी करत होते. त्यांची बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचा फोटो नजीब मुल्लाने स्टेटसला ठेवला. नजीब मुल्लाने ओसामा नावाच्या माणसाला सुपारी दिली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी या संदर्भात मॅसेज केला आहे. त्यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. इतर मॅसेजवर ते प्रतिक्रिया देतात. पण त्यांचे अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राईट अँड लेफ्ट हॅन्ड आहेत. त्यामुळे ते कारवाई करतील की नाही? याबाबत शंका असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले.
