Spread the love

भोपाळ / महान कार्य वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचे निमित्त साधत भारतात दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया येथून चित्ता आणण्यात आले होते. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये या सर्व चित्यांचे संगोपन होत असून यापूर्वी येथील काही चित्त्यांचा मृत्यू झाला होता. आता, गेल्या 8 वर्षांपासून येथील कुनो नॅशनल पार्कमध्ये असलेल्या नाभा नामक मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. नाभाला एका आठवड्यापूर्वी पार्कमध्ये जखमी अवस्थेत पाहण्यात आलं होतं. त्यानंतर, तेथील वैद्यकीय पथकाने तिच्यावर उपचारही सुरू केले. मात्र, शर्थीचे प्रयत्न करुनही नाभा मादी चित्त्यास वाचविण्यास अपयश आले.

कुनो नॅशनल पार्कच्या व्यवस्थापकाने प्रेसनोटच्या माध्यमातून नाभाच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. नाभाच्या मृत्यूमुळे आता कुनो नॅशनल पार्कमधील चित्त्यांची संख्या कमी होऊन 26 एवढी झाली आहे. या 26 प्राण्यांमध्ये 9 ज्येष्ठ चित्ते असून त्यात 6 मादी आणि 3 नर आहेत. तर, भारतात जन्म घेतलेले 17 चित्त्यांचे बछडे आहेत. वन विभागाच्या माहितीनुसार, उर्वरीत सर्वच चित्ते स्वस्थ आणि नीट आहेत. प्रोजेक्ट चित्ता या मोहिमेंतर्गत चित्त्याचे पुनर्वसन करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. मात्र, सुरुवातीपासूनच अनेक अडचणींचा सामना या प्रोजेक्टमध्ये करावा लागत आहे.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समोर येईल

कुनो राष्ट्रीय उद्यानातील 8 वर्षीय नामिबियन मादी चित्ता, नाभा हिचा आज मृत्यू झाला. एक आठवड्यापूर्वी सॉफ्ट रिलीज बोमामध्ये शिकार करत असताना ती जखमी झाली होती. त्यामध्ये, तिला उलना आणि फायब्युला या दोन्ही ठिकाणी फ्रॅक्चर झाले होते आणि इतर जखमाही झाल्या होत्या. गेल्या एक आठवडापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अनेक ठिकाणच्या जखमांमुळे अखेर ती मृत्यू पावली. दरम्यान, तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पीएम रिपोर्ट आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे अधिक कारण कळेल. दरम्यान, यापूर्वी कुनोतील मादी चित्त्यांपैकी एक असलेल्या धात्रीचा गतवर्षी मृत्यू झाला होता. त्यामुळे, गेल्या काही वर्षात कुनो नॅशनल पार्कमध्ये एकूण 10 चित्त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.