Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

दिल्ली एनसीआरमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. हरियाणाच्या काही भागांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी नऊ वाजून चार मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील झज्जर येथे होता. दिल्ली एनसीआरला 4.4 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

भूकंपामुळे जमिनीखाली 10 किमी. आतपर्यंत जमीन हादरल्याची नोंद भूकंपमापन केंद्राने केली आहे. संपूर्ण दिल्ली एनसीआर तसेच हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद भूकंपमापन केंद्राने केली. अनेक ठिकाणी दहा सेकंद जमीन हादरत होती. भूकंप झाल्यावर काही ठिकाणी नागरिक खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीमधून बाहेर मोकळ्या जागेत आले होते.