Spread the love

सिंधुदुर्ग / महान कार्य वृत्तसेवा

मालवणच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली नौका बुडाल्याची बातमी समोर आली आहे. आधीच सिंधुदुर्गातील वातावरण खराब आहे. मान्सून आणि वादळी वाऱ्यांमुळे तिथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र तरीसुद्धा मासेमारीसाठी बाहेर पडलेल्या मच्छिमारांची बोट उलट झाली आहे.

मालवण समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक छोटी नौका आज सकाळी बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या नौकेतील दोघे जण सुदैवाने बचावले असून, एक मच्छीमार अद्याप बेपत्ता आहे. वारा आणि समुद्रातील उसळत्या लाटांच्या जोरदार माऱ्यामुळे ही नौका पलटी होऊन त्यातील तिघे मच्छीमार पाण्यात फेकले गेले होते.

सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मेढा राजकोट येथील समुद्रात ही घटना घडली. मेढा जोशीवाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी, सचिन सुभाष केळुसकर आणि जितेश विजय वाघ हे तिघे मच्छीमार मासेमारीसाठी गेले होते. यावेळी समुद्रात अचानक जोरदार वारा सुटला आणि मोठ्या लाटा उसळू लागल्या. लाटांच्या तडाख्यात त्यांची मासेमारी नौका पलटी झाली.

अपघातानंतर कीर्तीदा तारी आणि सचिन केळुसकर यांनी स्वत:ला वाचवण्यात यश मिळवले, परंतु जितेश विजय वाघ हा समुद्रात बेपत्ता झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छिमारांनी तात्काळ जितेशचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली असून, बेपत्ता मच्छीमार जितेश वाघचा शोध घेण्याचे कार्य वेगाने सुरू आहे.