Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मीरा-भाईंदर शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांचे निवासस्थान गाठले आणि त्यांना ताब्यात घेतले. तर अविनाश जाधव यांच्यासह अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

रोहित पवार म्हणाले की, पर प्रांतीय व्यापाऱ्यांना तुम्ही मोर्चाला परवानगी देतात. मात्र, मराठी माणसाला परवानगी देत नाहीत, ही अशी भूमिका प्रशासन घेत आहे. हिंदी सक्ती विरोधात हा लढा होता. मात्र, भाजपने हा लढा बिहार आणि मुंबई महापालिका इलेक्शनसाठी केला आहे. मराठी विरुद्ध अमराठी असा वाद निर्माण केला आहे. ही दुटप्पी भूमिका आहे. राज ठाकरे यांना भाजपचा खरा चेहरा कळला असेल. ते आता कोणता निर्णय घेतात हे बघावे लागेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.

प्रकाश महाजन आंदोलन करणार

मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर, मनसे नेते प्रकाश महाजन आणि सरचिटणीस वैभव खेडेकर हे खेड तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलनाला बसणार आहेत. अविनाश जाधव यांना तातडीने सोडण्याची मागणी करत हे आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, ”आज पहाटे साडेतीन वाजता आमच्या पक्षाचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली. शासनाच्या या दडपशाहीविरोधात, मी आणि आमचे सरचिटणीस वैभव खेडेकर खेड येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करणार आहोत,” अशी माहिती त्यांनी दिली.

मनसेचा मोर्चा नेमका कशासाठी आहे? मीरा-भाईंदर शहरात मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. शहरात मराठी भाषेला दुय्यम वागणूक दिली जात आहे, मराठी नागरिकांना घर देण्यास नकार दिला जातो, तसेच विशिष्ट समाजाच्या नावावरून शहरात जाणूनबुजून तणाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.  या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी सर्व मराठी संघटना, विविध राजकीय पक्षांतील मराठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आले असून, त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.