मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठी अस्मिता आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावर मीरा-भाईंदरमध्ये मनसेने मोर्चाचे आयोजन केले आहे. आज सकाळी बालाजी हॉटेलपासून मीरारोड स्टेशनपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काल रात्री साडेतीन वाजता मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच वसई-विरार परिसरातील अनेक पदाधिकाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मनसेने कारवाई झाली तरी मोर्चा निघणारच, असा ठाम पवित्रा घेतला आहे. सध्या मीरा रोडवर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. पोलिसांकडून कार्यकर्त्यांच्या धरपकड सुरु करण्यात आली आहे. आता या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलंय.
योगेश कदम म्हणाले की, ज्या ठिकाणी परवानगी मागितली आहे, त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितले आहे की, तुम्ही जागा बदला. तुम्हाला आम्ही मोर्चाची परवानगी देऊ. मात्र, ते मोर्चाची जागा बदलण्यास तयार नाहीत. आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत. यात कोर्टाच्या काही गाईडलाईन्स देखील आहेत. त्या गाईडलाईन्सचे आम्हाला पालन करायचे आहे. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची आम्हाला काळजी घ्यायची आहे. अजूनही आम्ही त्यांना परवानगी द्यायला तयार आहोत. जर त्यांनी मोर्चाची जागा बदलली तर त्यांना परवानगी देण्याची आमची तयारी आहे. त्या ठिकाणी आधी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. त्यांनी देखील परवानगी घेतली नव्हती. त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे ही आमची जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनसेच्या मोर्चाला परवानगी देण्यात आली नाही, यावरून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांची भूमिका अत्यंत चुकीची असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे. मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी व्यक्त केली आहे. गृहखात्याचे आदेश नव्हते, तरी देखील पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून धरपकड केली, याची माहिती घेत आहोत. व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण समिती मोर्चा काढत होती. तर तुम्हाला काय अडचण होती? त्यांना मोर्चा का काढू दिला नाही. यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. मीरारोडमध्ये जे सुरु आहे ते अत्यंत चुकीचं आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
