Spread the love

इचकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

गहाळ झालेले, हरवलेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलचा तपास करुन शहापूर पोलिसांनी 27 मोबाईल मुळ मालकांना परत दिले. तब्बल 4 लाख 62 हजार रुपयांचे हे मोबाईल असून ते परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून येत होते.

शहर व परिसरात मोबाईल चोरीच्या घटनात सातत्याने वाढच होत आहे. आठवडी बाजारात मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक होते. या संदर्भात शहापूर पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीच्या अनेक तक्रारी दाखल होत्या. अशा मोबाईलचा पोलिसांनी सीईआयआर या पोर्टलच्या माध्यमातून शोध घेतला. त्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल रोहित डावाळे व अभिजित तेलंग यांचे पथक तयार करुन चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात येत होता. यामध्ये सायबर पोलिस ठाणेकडील पोहेकॉ अमर वासुदेव यांच्या सहकार्याने महिन्याभरात 4 लाख 62 हजार रुपयांचे 27 मोबाईल महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून शोधून ताब्यात घेतले आहेत.

या सर्व मोबाईलची कागदोपत्री खात्री करुन घेत पोलिस निरिक्षक सचिन सुर्यवंशी यांच्या हस्ते मुळ मालकांना मोबाईल परत देण्यात आले. ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ अथवा चोरीस गेलेले आहेत त्यांनी तात्काळ सीईआयआर या पोर्टलवर तात्काळ माहिती भरावी, असे आवाहन पोलिस निरिक्षक सुर्यवंशी यांनी केले आहे.