मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
एसआयटीच्या अहवालानुसार दिशा सालियानची हत्या किंवा कट रचल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे दिशा सालियानच्या मृत्यूवरून आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्या भाजपा नेत्यांनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे (यूबीटी) खासदार संजय राऊत यांनी केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
खासदार संजय राऊत म्हणाले, ” राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (आदित्य ठाकरे यांची) माफी मागावी. नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे, इतर भाजपा नेते आणि एकनाथ शिंदे या सर्वांनी शिवसेना (यूबीटी) आणि आदित्य ठाकरे यांची माफी मागावी.” राणेंनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणीदेखील राऊत यांनी केली.
अहवाल स्वीकारणार नाही-राऊत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांची एकसदस्यीय त्रिभाषा समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर खासदार राऊत म्हणाले, ”नरेंद्र जाधव यांना उपराष्ट्रपती होण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात होते. त्यांची त्रिभाषा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानं नक्कीच शंका येते. समितीच्या अध्यक्षपदी भैय्या जोशी आणि दत्तात्रय होसबाळे आले तरी त्यांचा अहवाल स्वीकारणार नाही.”
मराठी माणसासाठी दोन्ही बंधू एकत्र-हिंदी भाषेबाबत जीआर रद्द झाल्यानंतर 5 जुलैला शिवसेना आणि मनसे यांचा एकत्रित मेळावा घेण्यात येणार आहे. त्याबाबत राऊत बोलताना म्हणाले, ”5 जुलैच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या. दोन्ही ठाकरे बंधुंनी ( राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) मराठी माणसावरील अन्याय लढण्याचं ठरिवलं आहे. त्या निर्णयाला आम्ही बांधील आहोत. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेच आकर्षण आहे. त्यापलीकडं प्रोटोकॉल नाही. विजयी मेळाव्यासाठी फक्त शिवसेना आणि मनसे तयारी करत आहे. इतर कोणी आले तर त्यांचं स्वागतच आहे.”
वयाचं भान राखून बोलावं-उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र असताना माजी मंत्री नारायण राणे यांनी टीका केली. त्यांच्यावर राऊत यांनी पलटवार केला. ते म्हणाले, ” नारायण राणे यांच्या बोलण्याकडे कोणीही गांभीर्य पाहत नाही. भाजपामध्ये गेलेला प्रत्येक माणूस महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यांनी भाजपामध्ये जाऊन कोकणाचं नुकसान केलं आहे. काही लोक महाराष्ट्रात स्वाभिमान बाळगतात. भाजपा म्हणून महाराष्ट्र नाही. नारायण राणेंनी वयाचं भान राखून बोलावं. 2 जुलैच्या सुनावणीत काय घडलं? सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी एप्रिलच्या सुरुवातीला शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध त्यांच्या मुलीच्या मृत्यूमध्ये कथित सहभाग असल्याबद्दल रिट याचिका दाखल केली होती. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिलीय. दिशाच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं.
