सातारा / महान कार्य वृत्तसेवा
पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळं धरणातील आवक 33 हजार क्युसेक्सवर पोहोचली असून, पाणीसाठा 59 टीएमसी झाला आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, गेल्या 24 तासांत महाबळेश्वरात सर्वाधिक 124 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात प्रति सेकंद 33,266 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. पाणीसाठ्यात तब्बल पावणे तीन टीएमसीनं वाढ झाली असून, पाणीसाठा 59 टीएमसी झाला आहे.
महाबळेश्वरात मुसळधार पाऊस : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढतच आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळं पाण्याची आवक 28 हजार क्युसेक्सवरून 33 हजार क्युसेक्सवर गेली आहे. तसंच महाबळेश्वर परिसरात धुवांधार पाऊस कोसळत असून, गेल्या 24 तासांत 124 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयनानगरमध्ये 90 आणि नवजा येथे 73 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील पाणीसाठा साठीकडे : पाण्याची आवक वाढत असल्यानं पाणीसाठ्यात देखील वेगानं वाढ होत आहे. सध्या धरणात 59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून, पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. काल (बुधवारी) दुपारी विमोचकातून विसर्ग करण्यात येणार होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव विसर्ग वाढवण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज : कोकणसह घाट परिसरात जास्त पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसंच दक्षिण मध्य महाराष्ट्रात पुढील दोन आठवडे राज्यात पावसाचं समान चित्र दिसू शकतं. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळं कोयना धरणातून पाणी सोडावे लागेल. त्यातून कोयना आणि कृष्णा नदीकाठी पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
