राज्य शासनाच्या आदेशाची हातकणंगलेत होळी
हातकणंगले / महान कार्य वृत्तसेवा
महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिल्यापासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून हातकणंगले तहसील कार्यालयासमोर संबंधित अध्यादेशाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, तसेच कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी ‘मराठीचा अभिमान जपा’, ‘हिंदी सक्तीचा निषेध असो’, ‘मराठी शाळा, मराठी भाषा, आमचा स्वाभिमान’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख संजय चौगुले म्हणाले की “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती केंद्र सरकारची एक संवाद भाषा आहे. महाराष्ट्राच्या मातीचा गंध असलेली मराठी हीच आपल्या ओळखीची भाषा आहे. राज्य शासनाने पारित केलेला हिंदी सक्तीचा अध्यादेश हा मराठी भाषेच्या अस्मितेवर घाला आहे. जर लवकरच हा निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार आणखी तीव्र स्वरूपात जिल्हाभर आंदोलन उभं केलं जाईल.”
शिवसेना पक्षाने नेहमीच मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढा दिला आहे आणि पुढेही देत राहील. या आंदोलनाद्वारे पक्षाने राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची भाषा सक्ती खपवून घेतली जाणार नाही.
जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पन्हाळा तालुकाप्रमुख बाबा पाटील, शाहुवाडी तालुकाप्रमुख दत्ता पवार, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल मगदुम, महिला आघाडीच्या उप जिल्हासंघटिका सुवर्णा धनवडे, उप तालुका संघटिका मालती खोपडे, हातकणंगले उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, विनोद पाटील आप्पा, संदीप दबडे, विजय भोसले, प्रकाश पाटील, सागर चोपडे, अमोल देशपांडे, संभाजी हांडे, सुहास सपाटे, महेश कोरवी, शामराव पाटील, नाना दबडे, जालिंदर जाधव, सुहास सपाटे, संजय लोहार, कृष्णात दिंडे, हेमंत पाटील, सुमित पाटील, संदीप शिनगारे, धनाजी पाटील, ओंकार पाटील, अर्जुन जाधव, विकी लोखंडे, अनिकेत पांडव, अरुण घाटगे, संतोष पाटील, मोहन पवार ,रजनीकांत माने, अनिल रोटे, प्रकाश माळी सचिन चौगुले, अनंत जाधव, रविंद्र पाटील, मंदार गडकरी, महेश माटके, यशवंत चव्हाण यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
