Spread the love

इचलकरंजी शहर प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त  शोभायात्रेत महानगरपालिकेच्या विविध विभागाकडून सोयी सुविधा या बाबतचे डिजिटल फलक लावण्यात आले होते.

महानगरपालिका पाणी पुरवठा, अग्निशमन आणि आरोग्य विभागाकडील अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता. नगर रचना विभागाचा मुलींच्या कथक नृविष्कार, वाहन विभाग महानगरपालिका लोगो, लेखा परीक्षण विभाग वासुदेव, लेखा विभाग छत्रपती शाहू महाराज, ग्रंथालय विभाग शिक्षणाचे महत्त्व आदी वाहने लक्ष वेधून घेत होती. शहरातील अल्फोंसा स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बँड पथक आणि सचिन नाईक स्केटिंग अकॅडमीच्या विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

महानगर पालिका वर्धापन दिननिमित्त शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, फादर, वासुदेव, संत गाडगेबाबा आदी वेशभूषा केलेले  अधिकारी कर्मचारी लक्ष वेधून घेत होते. काही विभागांनी हालगी सारख्या वाद्यांचा वापर केला होता. शोभायात्रेत पुरुष अधिकारी कर्मचारी कुर्ता पायजमा आणि फेटा तर स्त्री अधिकारी कर्मचारी नऊवारी साडी आणि फेटा या पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

या शोभायात्रेचा शुभारंभ आयुक्त  पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, मुख्य लेखा परीक्षक आरती खोत यांच्या उपस्थितीत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

शोभायात्रा महानगरपालिका मुख्य कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवतीर्थ, महात्मा गांधी चौक, राजवाडा चौक, रसना कॉर्नर, नाट्यगृह चौक, चांदनी चौक, छत्रपती संभाजी चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा या शहरातील मुख्य मार्गावरून महानगरपालिका कार्यालयात शोभायात्रेचा समारोप झाला.


हलगी वर आयुक्तांचा भन्नाट डान्स

हलगीचा ठोक्यावर महीला अधिकारी व कर्मचारी या ताल धरून नाचत होत्या. त्यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनीही महिला कर्मचाऱ्यांमध्ये सहभागी होत हलगीच्या ठेक्यावर भन्नाट डान्स केला. यामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या उत्साहात वाढ झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्यासोबत त्यांनी थोडीही खेळल्याने शोभायात्रेतील कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढल्याचे दिसून आले.

डॉल्बीवर कर्मचाऱ्यांचा जल्लोष

महापालिका आवारामध्ये शोभायात्रेचा समारोप झाल्यानंतर डॉल्बीच्या दणदणाटामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांनी बेफाम ठेका धरत जल्लोष केला. यामध्ये महिला कर्मचारी ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेषता आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या स्वतंत्र दोन डॉल्बीवर कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोष करण्यामध्ये जणू चुरसच लागलेली होती.