बुलावायो / महान कार्य वृत्तसेवा
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत विजय मिळवल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ आज 28 जूनपासून झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात करणार आहे. आफ्रिकन संघाला इथं दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे, जी 2025-27 वर्ल्ड टेस्ट स्पर्धेचा भाग नाही. परंतु तरीही, त्यांना काही नवीन खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी नक्कीच मिळेल. दक्षिण आफ्रिका झिम्बाब्वेविरुद्धच्या या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने बुलावायो मैदानावर खेळेल. त्यांनी पहिल्या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग 11 संघांची घोषणा केली आहे. यासह दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे.
डिवाल्ड ब्रेव्हिस आणि प्रिटोरियस यांना कसोटी पदार्पणाची संधी : बुलावायो मैदानावर खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ केशव महाराजांच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यासाठी जाहीर झालेल्या प्लेइंग 11 मध्ये, डिवाल्ड ब्रेव्हिस आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस पदार्पण करतील. ब्रेव्हिस बराच काळ आफ्रिकन कसोटी संघाचा भाग होता पण त्याला या फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळत नव्हती. या दोन खेळाडूंव्यतिरिक्त, कोडी युसूफ, टोनी डी जियोर्गी आणि कॉर्बिन बॉश हे देखील पहिल्या कसोटी सामन्यात खेळताना दिसतील. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर करण्यात आला तेव्हा अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्याच्या उद्देशानं त्यांची निवड करण्यात आली नव्हती.
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग 11 :
टोनी डी जॉर्जियो, मॅथ्यू ब्रेट्झके, विआन मुल्डर, डेव्हिड बेडिंगहॅम, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डेवाल्ड ब्रेव्हिस, काइल वेरेन (यष्टिरक्षक), कॉर्बिन बॉश, केशव महाराज (कर्णधार), कोडी युसेफ, क्वेना मफाका.
ब्रेव्हिसची प्रथम श्रेणी कारकिर्द कशी : आयपीएल 2025 च्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा डिवाल्ड ब्रेव्हिस सध्याच्या काळातील प्रतिभावान तरुण खेळाडूंमध्ये गणला जातो. जर आपण 22 वर्षीय ब्रेव्हिसच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रमावर नजर टाकली तर त्यानं 20 सामन्यांमध्ये 41.31 च्या सरासरीनं 1322 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 4 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकली आहेत.
